Fri, Apr 19, 2019 12:03होमपेज › Kolhapur › वाहतूक आराखड्याचे घोडे निधीत अडले

वाहतूक आराखड्याचे घोडे निधीत अडले

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:13AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना शहरासाठी वाहतूक आराखड्याची गरज वारंवार अधोरेखित झाली. त्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या पुढाकाराने इचलकरंजी शहरासाठी नवीन वाहतूक आराखडा तयार केला. या आराखड्याला पालिकेने मंजुरी देऊन चार वर्षे लोटली तरी पालिकेने वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे इचलकरंजी शहराच्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणीचे घोडे निधीत अडले आहे. 

इचलकरंजी शहरात वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची रुंदी वाढवण्याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ते रुंदीकरणाचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. त्यामुळे अपघातही नित्याचेच झाले आहेत. 

अशा परिस्थितीत इचलकरंजी शहरासाठी वाहतूक आराखडा मंजूर केल्याने वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याद‍ृष्टीने शहर वाहतूक शाखेने शहरासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने 12 डिसेंबर 2014 रोजी मंजुरी दिली. त्यानंतर या आराखड्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती शहर वाहतूक शाखेला करण्यात आली. शहर शाखेने एक महिन्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर या आराखड्याची अंमलबजावणी केली. त्यानंतर ज्या सूचना व हरकती प्राप्‍त झाल्या, त्यांचा विचार करून सुधारित वाहतूक आराखडा तयार करण्यात आला. त्यास नगरपालिकेने 25 जानेवारी 2018 रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे शहरात एकेरी वाहतूक, पार्किंग, नो-पार्किंग, वाहतूक मार्ग बंद अशा अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

या वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखा व इचलकरंजी शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली. बैठकीस मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, शहर अभियंता बापूसाो चौधरी, एस.टी. आगाराचे प्रमुख पाटील, शहर वाहतूक शाखेचे अरुण पवार, रिक्षा, ट्रक, ट्रॅव्हल्स चालक - मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत रस्त्यांच्या बाजूला पार्किंगचे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याचे, वाहतूक चिन्हांचे फलक लावण्याचे व नवीन सिग्‍नल खरेदीकरिता आर्थिक तरतूद करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ.रसाळ यांनी दिले; परंतु वाहतूक आराखडा मंजूर होऊन चार वर्षे लोटली तरी वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरिता पालिकेकडून आवश्यक ती आर्थिक तरतूद होत नसल्याने वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीत निधीची अडचण येत आहे.