कोल्हापूर : प्रतिनिधी
माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या पहिल्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रावर अकरा वाजण्यापूर्वी पोहचणे बंधनकारक असल्याने विद्यार्थी आणि पालकंची धावपळ उडाली.
बिनखांबी गणेश मंदिरापासून न्यू महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांची गर्दी होती. यात प्रामुख्याने परगावाहून आलेल्या भाविकांची वाहने होती. याच परिसरात पदमाराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, मलग हायकस्कूल, इंदूमती हायकस्कूल अशा अनेक शाळा आहेत. याच परिसरात महालक्ष्मी मंदिरही आहे. याठिकाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांची नेहमीच गर्दी असते. परगावच्या भाविकांना वाहनतळाअभावी आपली वाहने रस्त्यावरच लावावी लागतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंदी होते. त्याचाच त्रास गुरुवारी दाहावीच्या विद्यार्थ्यांना झाला.
सकाळी ९ वाजल्यापासून बिनखांबी गणेश मंदिरापासून शिवाजी पेठ, न्यू महाद्वार रोड आणि महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी होती. आई-वडील आणि इतर पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रवार सोडण्यासाठी जात होते. एक विद्यार्थी आणि त्याच्यासोबत चार ते पाच पालक असल्याने गर्दीचे प्रमाण वाढले. त्यातच आज होळी असल्याने या परिसरात नेहीपेक्षा जास्त गर्दी असल्याने परिसरातील सर्व रस्ते गर्दीने हाउसफूल झाले होते. परिणामी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूपच धावपळ करावी लागली. यामुळे काही विद्यार्थी बरेच गोंधळून गेले होते. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची समजूत काढून पालकांनी कसे बसे त्यांचा परीक्षा केंद्रपर्यंत पोहचवले.