Fri, Apr 19, 2019 08:42होमपेज › Kolhapur › वर्षभरात शहरात पाऊण कोटी पर्यटक

वर्षभरात शहरात पाऊण कोटी पर्यटक

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 1:33AMकोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूरला वर्षभरात सुमारे पाऊण कोटीहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतलेल्या एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील भाविकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. भाविक, पर्यटकांमुळे शहराच्या बाजारपेठात 200 कोटींवर उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक, दक्षिण काशी म्हणून ओळख असणार्‍या कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. गेल्या काही वर्षांपासून भाविकांत सातत्याने वाढ होत आहे. धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर आहे. पर्यटनदृष्ट्या होत असलेल्या विधायक कामांमुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात येणारी गर्दी वाढू लागली आहे. जोडून येणार्‍या सुट्ट्या, तसेच हंगामी सुट्ट्यांच्या काळात तर कोल्हापूर भाविक, पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते. 

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरद्वारे नोंद होते. एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत मंदिरात दर्शन घेतलेल्या भाविकांचा आकडा 60 लाख 28 हजार इतका नोंदवला गेला आहे. मशीनद्वारे समोर आलेला आकडा 60 लाखांचा असला तरी प्रत्यक्षात ही संख्या 75 ते 85 लाखांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक कारण, काही वेळा बंद पडणारी यंत्रणा आणि गर्दी वाढली की मोजणीवर होणारा परिणाम यामुळे मूळ आकडेवारीपेक्षा 25 ते 30 टक्के जादा संख्या आहे. त्यात स्थानिक, दुकानदार आदींचा विचार केला तर केवळ मंदिरातील भाविकांची संख्या 50 ते 60 लाखांपर्यंत जाते. मंदिराखेरीज शहरात येणार्‍या भाविकांची संख्या अधिक असल्याने शहराला गतवर्षी सुमारे 70 ते 75 लाख लोकांनी भेट दिल्याचे स्पष्ट होत आहे.

भाविक आणि पर्यटकांमुळे शहरात वर्षभरात 200 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरेदीपासून ते चहा, नाश्ता, जेवण, प्रवास आदींचा विचार केला तर प्रत्येकाचा सरासरी 200 ते 300 रुपये खर्च होत आहे. यामुळे वर्षभरात शहरात मोठी उलाढाल झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.  शहरात भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला आहे, त्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत. यासह शहरात पर्यटन विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा पर्यटक वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. देवदर्शनासह निसर्ग, ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद भरभरून लुटता यावा इतकी परिपूर्ण ठिकाणे जिल्ह्यात आहेत. यामुळे पर्यटकांच्या पसंतीच्या प्रमुख शहरांपैकी एक म्हणून कोल्हापूरची ओळख दृढ होत चालल्याने यावर्षी पर्यटकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

भाविकांच्या संख्येत वाढ : पोवार
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्यावर्षी 60 लाख 28 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. मात्र, त्यापेक्षा भाविकांची संख्या अधिक असल्याचे देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी सांगितले.