Fri, Nov 16, 2018 19:28होमपेज › Kolhapur › शहर पर्यटकांनी फुलले

शहर पर्यटकांनी फुलले

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी निसर्गसंपन्‍न कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर हजेरी लावली आहे. अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील अन्य धार्मिक स्थळांसह पर्यटनस्थळावरही पर्यटकांची गर्दी उसळली होती. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने बाजारातही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. 

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूरच्या पर्यटनाला पसंती दिली आहे. अंबाबाई मंदिरात व जोतिबाच्या दर्शनासाठी भक्‍तांची रांग लागली होती. यानंतर घोळक्याने भक्‍त अंबाबाईच्या दर्शनासाठी येत होते. प्रेक्षणीय स्थळे आणि देवदर्शनानंतर पर्यटकांनी कोल्हापुरी चप्पल, साज, गूळ, खरेदीबरोबर कोल्हापुरी भेळ, मिसळसह खास कोल्हापूर ब्रँडेडच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. रखरखत्या उन्हात भक्‍तांचा उत्साह कायम होता. न्यू पॅलेस, रंकाळा, पंचगंगा घाट, कणेरीमठ, भवानी मंडप येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती.

गूळ, रानमेवा आणि चप्पल खरेदीकडे कल 

दर्शन झाल्यावर पर्यटकांकडून कोल्हापुरी गूळ आणि चप्पल खरेदीसाठी खास वेळ काढला जात आहे. त्यामुळे महाद्वार रोड, पापाची तिकटी, चप्पल लाईन आणि गुजरी परिसरात पर्यटक खरेदीचा आनंद लुटत होते.  कोल्हापुरी चप्पल खरेदी, ज्वेलरी मार्केटमध्येही ठुशी, टिक्‍का, साज, रानमेवा खरेदीसाठीही गर्दी होती. 

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

अंबाबाई मंदिर मंदिरासह जोतिबा, नृसिंहवाडी अशा धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी आहे. त्याचबरोबर पर्यटकांनी रंकाळा, न्यू पॅलेस, पन्हाळा, आंबा, दाजीपूर, राधानगरी,  गगनबावडा, अशा निसर्गरम्य ठिकाणांनाही पसंती दिली. पर्यटक भाविकांच्या वाहनांनी कोल्हापूरचे रस्ते भरून गेले.

कोल्ड्रिंक हाऊस, हॉटेल फुल्ल

गेल्या महिन्याभरापासून सूर्य आग ओकत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पर्यटक सरबत, ज्यूस, आईस्क्रिम, कलिंगड आदी पदार्थांचे सेवन करताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत शहरातील कोल्ड्रिंक हाऊस, हॉटेलमध्येही गर्दी  होती.