Fri, May 24, 2019 06:42होमपेज › Kolhapur › पर्यटकांना खुणावतेय निटवडेची टेकडी 

पर्यटकांना खुणावतेय निटवडेची टेकडी 

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 12:18AMमाजगाव : वार्ताहर

कधी डोळ्यासमोरचं दिसणारच नाही इतकं दाट धुकं तर कधी निरभ्र आकाश व समोर दुथडी भरून वाहणार्‍या नागमोडी वळणाच्या कासारी नदीचे विहंगम दृश्य. घोंघावणारा वारा आणि आभाळातून थेट डोंगराच्या रंगमंचावर सुरू असणारा पावसाचा नाच अनुभवण्यासाठी कोल्हापूरपासून अवघ्या 10 कि.मी. वर असणार्‍या निटवडे (ता. करवीर) येथील छोट्याशा टेकडीवर निसर्ग प्रेमींनी एकदा जायलाच हवं. 

प्रयाग चिखलीपासून पुढे यवलूजकडे जाताना डाव्या बाजूला वसलेलं अवघ्या पाचशे ते सहाशे लोकवस्तीचे निटवडे गाव. रहदारीपासून थोडं लांब असल्याने शांत व प्रदूषणविरहित हवा. गावाच्या पुढे गेल्यावर 85 एकरांची एक उंच टेकडी आहे. गावकरी तिला गावखडी म्हणून ओळखतात.   या टेकडीवर जाण्यासाठी वळणावळणाचा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात निसरडे होत असल्याने मोठ्या चाकाच्या गाड्या वगळता वर कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. छोटी वाहने टेकडीच्या पायथ्याशी पार्किंग करूनच वर जावे लागते.  

टेकडीवर गेल्यावर दुथडी भरून वाहणार्‍या कासारी नदीचे नागमोडी वळण मन मोहीत करते. कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा नदीच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. हिरव्यागार गवताची शाल पांघरल्यासारखी दिसणारी  टेकडी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. दूरवर दिसणार्‍या डोंगर रांगा व एखाद्या पुंजक्याप्रमाणे दिसणारी छोटीशी गावं उंचावरून पाहणं एक वेगळाच अनुभव आहे. या टेकडीवर गेल्यावर समोर दिसणारे विस्तीर्ण आकाश पाहिले की आपले  अस्तित्व किती नगण्य आहे याची जाणीव होते. टेकडीवरून कोल्हापूर शहरासह पन्हाळा व  जोतिबा डोंगराचा नजारा सुंदर दिसतो. बावडा येथे असणारा तिरंगा सुद्धा येथून दिसतो. रात्री दिव्यांचा झगमगाट अनुभवता येतो. आकाशातून बरसणारा धो-धो पाऊस व धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या शेतवडीच्या हिरव्यागार रंगाच्या छटा निसर्गाच्या या अद्भूत चित्रकारीतेला सलाम करायला भाग पाडतात. इथं असणार्‍या भालचंद्र बाबांच्या  मंदिरामुळे टेकडीच्या सौंदर्यात भर पडली आहे. डिसेंबरमध्ये होणार्‍या  बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात, अशी माहिती तानाजी व्हराम्बळे यांनी दिली.