होमपेज › Kolhapur › 2019 च्या निवडणूक तयारीला लागाः पूनम महाजन

2019 च्या निवडणूक तयारीला लागाः पूनम महाजन

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 10:09PMकोल्हापूर : प्रतिनिधी

देश व राज्यात 2019 रोजी होणारी निवडणूक 50 टक्के सोशल मिडियाच्या ताकदीवर लढविण्यात येणार आहे. कोणत्याही संघटनेत संघर्ष असतो. कार्यकर्त्यांनी अडचणींवर मात करीत स्वत:च प्रश्‍नांची उत्तरे शोधत निवडणूकीच्या तयारीला लागावे असा आदेश भारतीय जनता युवामोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. 

‘भाजयुमो’च्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील युवासंवाद यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.22) आयोजित पदाधिकारी मंडल, कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. खा. महाजन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेत प्रश्‍नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, देशभर फिरल्यानंतर दहा वर्षानंतर महाराष्ट्रात राजकीय प्रवास सुरु केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा ही भाजपमध्ये जाण्याच्या यशाची पायरी आहे. भारत हा 2025 मध्ये युवांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. युवकांमधील ऊर्जामुळेच देशांचा विकास झाला आहे. भाजप सरकारच्या काळात डिजीटल इंडिया, स्किल इंडिया, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आदी गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकशाहीत युवकांचा सहभाग वाढत चालला आहे. त्यांनी चांगल्या गोष्टींवर वाद घालण्याची तयारी ठेवली पाहिजे. आज दुर्देवाने कार्यकर्त्यांकडून सरकारचे नवनवीन कार्यक्रम जनेतपर्यंत पोहचत नाहीत. सोशल मिडिया देशातील तरुणांच्या मनाला खराब करीत आहे हे कुठेतरी थांबायला हवे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास, अभ्यास, उत्साह व संयमाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारचे काम व योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.  युवा कार्यकर्त्यांनी जीएसटी, डिजीटल मिडिया, कौशल्य विकास योजनांबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना खा. महाजन यांनी थेट उत्तरे दिली.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आ.योगेश टिळेकर यांनी संवाद यात्रेबद्दल माहिती दिली. यावेळी मधुकेश्‍वर देसाई, अतुलकुमार (बिहार), चारु प्रज्ञा, अलोक डागस, विक्रांत पाटील, अमोल जाधव, देवांग ढमे, राजू तोडसाम, अजय चौगुले यांच्यासह देश व राज्यातील युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मॅडम कॉगे्रसमध्ये इकडे फक्‍त ताई..
युवा संवाद मेळाव्यात एका तालुका अध्यक्षाने मॅडम असे म्हणत खा. महाजन प्रश्‍न विचारला. त्याला तात्काळ उत्तर देत खा. महाजन यांनी ‘मॅडम काँगे्रसमध्ये एकडे फक्त ताई’ असे म्हणण्यास सांगितले. तालुका अध्यक्षाने रॅलीवेळी पायावरुन गाडी गेल्याचे सांगताच व्यासपीठावरुन ऊठून त्याची चौकशी केली व दवाखान्यात जाण्याबाबत सूचना केली.