Thu, May 23, 2019 21:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › टिंडर डेटिंग अॅप...धोक्याची घंटा!

टिंडर डेटिंग अॅप...धोक्याची घंटा!

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:41AMकोल्हापूर : सुनील कदम

गेल्या काही दिवसांपासून तरुणाईला मोबाईलमध्ये सहजासहजी उपलब्ध होणार्‍या ‘टिंडर डेटिंग अ‍ॅप्लिकेशन’ने चांगलीच भुरळ पडलेली दिसत आहे. मात्र, हे अ‍ॅप्लिकेशन तरुणाईसाठी धोक्याची घंटा समजण्यास हरकत नाही. कारण या अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात लैंगिक स्वरूपाच्या गुन्हेगारीसाठी होताना आढळून येत आहे. गोवा आणि दिल्लीसारख्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे लोण लवकरच राज्यातही पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षिततेच्या द‍ृष्टिकोनातून या अ‍ॅपच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे.

सन 2012 मध्ये काही पाश्‍चात्त्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून या अ‍ॅपची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीच्या काळात संबंधितांनी आपल्या महाविद्यालयीन संपर्क क्षेत्रापुरता याचा वापर मर्यादित स्वरूपाचा ठेवला होता. मात्र, आज जगभरातील 196 देशांतील कोट्यवधी लोक आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन युवक-युवती या अ‍ॅपचा वापर करतात. भारतातही लाखो लोक या अ‍ॅपचा वापर करताना दिसत आहेत. 

तुमचे फेसबुक अकाऊंट हेच या अ‍ॅपच्या वापराचा मुख्य आधार आहे. त्यामुळे या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांचे फेसबुक अकाऊंट असणे आवश्यक आहे. अ‍ॅपल किंवा गुगलवरून हे अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करता येते. तुमच्या फसबुक अकाऊंटवरील माहितीच टिंडर अ‍ॅप अकाऊंटला वापरली जाते. ‘परस्पर सहमतीने परस्परांशी थेट संपर्क, संदेशांची देवाण-घेवाण, प्रत्यक्ष भेटीगाठी’ या हेतूने या अ‍ॅपचा वापर अपेक्षीत असला तरी कोणकोणत्या हेतूने, कुणाशी संपर्क करीत असेल, ते सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळे या अ‍ॅपचा वापर भलत्या कारणासाठीही होऊ शकतो आणि जगभरात तसे बरेच गैरप्रकारही आढळून येऊ लागले आहेत.

हे अ‍ॅप स्विपिंग अ‍ॅप असल्याने परस्पर संमतीशिवाय परस्पर संपर्क अशक्य आहे. टिंडर अ‍ॅपवर वापरकर्त्याने डाऊनलोड केलेले फोटो एखाद्याला आवडले आणि त्याने त्या फोटोला ‘लाईक’ केले म्हणून लगेचच संबंधितांमध्ये संपर्क प्रस्थापित होऊ शकत नाही. लाईक करणारा किंवा करणारी आणि ज्याच्या फोटोला लाईक केले तो किंवा ती, यांचा परस्पर होकार असेल तरच त्यांच्या संपर्क पुढे प्रस्तापित होऊ शकतो. त्याचप्रमाणे परस्परांची मत-मतांतरे परस्परांना पटली नाहीत तरी संपर्क विखंडीत केला जाऊ शकतो. एकदा का दोन वापरकर्त्यांमध्ये परस्पर संपर्क प्रस्थापित झाला की फेसबुकवरील माहितीच्या आधारे दोघांनाही परस्परांविषयी फेसबुकवर उपलब्ध असलेली सगळी माहिती टिंडर अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्याशिवाय टिंडर अ‍ॅप मित्रांना परस्परांच्या प्रत्येक वेळची स्थानिक माहितीसुद्धा मिळत राहते.

या अ‍ॅपच्या वापरात अनेक धोके आहेत. या अ‍ॅपचा मुख्य आधार म्हणजे वापरकर्त्यांचे फेसबुक अकाऊंट हे आहे. आज जगभरात  कोट्यवधी बोगस फेसबुक अकाऊंट आहेत. टिंडर अ‍ॅपवर वापरकर्त्याला समोरच्या व्यक्‍तीची जी माहिती उपलब्ध आहे, ती त्याच्या फेसबुक अकाऊंटवरूनच. त्यामुळे साहजिकच टिंडर अ‍ॅपवर उपलब्ध होणारी माहिती आणि फोटोसुद्धा अनेकवेळा बनावट असण्याची शक्यता आहे. दुसरी धोकादायक बाब म्हणजे ‘टिंडर फ्रेंडस्ना’ परस्परांविषयीची स्थानिक माहिती वेळोवेळी उपलब्ध होत राहणार आहे. या माहितीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करून कुणी कुणाचा पाठलाग करण्याचा अथवा संबंधितांवर छुपी पाळत ठेवण्याचा धोका आहे. 

आज देशात लाखोच्या संख्येने तरुणाई या अ‍ॅपचा वापर करताना दिसत आहे. देशातील टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या एकूण वापरकर्त्यांपैकी 96 टक्के वापरकर्ते हे 16 ते 44 या वयोगटातील आहेत. यावरून युवा पिढी किती मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपच्या जाळ्यात अडकत चालली आहे, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. त्यातही लैंगिक आकर्षणातून टिंडर डेटिंग अ‍ॅपचा वापर करणार्‍यांची संख्याच सर्वाधिक आहे. 
देशातील आणि राज्यातीलही काही महानगरांमध्ये या अ‍ॅपचा वापर करून ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या अ‍ॅपच्या वापराच्या माध्यमातून युवतींशी संपर्क साधून, त्यांना आपल्या टिंडर अ‍ॅपच्या जाळ्यात अडकवून, त्यांच्यावर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार केल्याच्या काही घटना दिल्ली आणि गोव्यासारख्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेले या अ‍ॅपचे लोण विचारात घेता राज्यातही ‘टिंडर डेटिंग अ‍ॅप’ गुन्हेगारी फोफावण्याचा धोका आहे. त्यामुळे या अ‍ॅपच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

ज्वालाग्राही आणि धोकादायक!
टिंडर याचा इंग्रजीतील शब्दश: अर्थ आहे ज्वालाग्राही आणि धोकादायक. देशातील आणि राज्यातील युवा पिढी ज्या वेगाने या अ‍ॅपच्या आहारी जाताना दिसत आहे, ते विचारात घेता या अ‍ॅपच्या नावाचे सार्थक होताना दिसत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घडलेल्या ज्या काही गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत, त्या विचारात घेता या अ‍ॅपच्या वापरातील धोकाही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. त्यामुळे युवा पिढीने या अ‍ॅपपासून चार पावले दूर राहणेच हिताचे आहे.