Thu, Jan 17, 2019 16:23होमपेज › Kolhapur › टिंबर मार्केटमध्ये तरुणावर तलवार हल्‍ला

टिंबर मार्केटमध्ये तरुणावर तलवार हल्‍ला

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 12 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आर्थिक वादातून टिंबर मार्केटमधील जुना गुराचा बाजारात सौरभ राजू चौगले (वय 18, रा. गंजीमाळ) याच्यावर तलवार हल्‍ला करण्यात आला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. अरुण परीट (पार्टे) याने हल्‍ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तर मारहाणीत अरुण परीट हादेखील जखमी झाल्याने दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम राजवाडा पोलिसांत सुरू होते. 

सौरभ चौगले सेंट्रिंगसह किरकोळ कामे करतो. रविवारी तो जुना गुरांचा बाजार येथून पायी निघाला होता. अरुण परीट यांच्या घरासमोरून जाताना कुत्रे भुंकल्याच्या कारणावरून वाद झाला. सौरभ आणि अरुण यांच्यात यापूर्वी पैशाच्या देवघेवीतून वाद झाले होते. याचा राग मनात धरून अरुण परीट याने तलवारीने हल्‍ला केल्याचे सौरभने सांगितले. सौरभच्या उजव्या हाताला, कानाला व मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. तर झटापटीत अरुण परीट याच्याही डोक्याला दुखापत झाली. 

रविवारी सायंकाळी दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीची माहिती मिळताच सौरभचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सीपीआरच्या आवारात गोळा झाले. राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, उपनिरीक्षक राजेंद्र भुतकर फौजफाट्यासह सीपीआरमध्ये आले. जखमींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

दारूविक्रीबाबत तक्रार
जुना गुरांचा बाजार येथे काही जणांना अवैधरीत्या दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. रात्री उशिरापर्यंत या परिसरात दारू विकत घेण्यासाठी मद्यपी येतात. यामुळे येथे वारंवार हाणामारीचे प्रकार घडत आहेत. येथील अवैध दारूविक्रीचा व्यवसाय तत्काळ बंद करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली.