Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली आहे. शहरासह जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक यंत्रणेसह राज्य राखीव, जलद कृती दल, गृहरक्षक दल असा सुमारे साडेचार हजारांवर पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. मध्यवर्ती चौक, फाट्यावर नाकाबंदी करण्यात येत आहे. महामार्गावरही ठिकठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव पाटील यांनी बुधवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षकांसह पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क साधून कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. बंदोबस्त नियोजनाची माहिती घेतली. महाराष्ट्र बंद शांततेत होण्यासाठी समाजातील सर्वच घटकांना विश्‍वासात घेऊन शांततेचे आवाहन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. शहर, वाड्या-वस्त्यांवरील हालचालींवर लक्ष केंद्रीत करावे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही. याची खबरदारी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गुरुवारी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विनायक परशराम गुदगी (वय 26, रा. कणेरीवाडी ता. करवीर) या तरुणाने आत्महत्या करून स्वत:चे बलिदान दिल्याने जिल्ह्यात आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे.

 अनुचित घटना टाळा : पोलिस यंत्रणेचे आवाहन

जिल्ह्यातील विविध घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंद जिल्ह्यात शांततेत होण्यासाठी वरिष्ठाधिकार्‍यांनी चार, पाच दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मराठा समाजातील प्रमुख मंडळी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना जिल्हा प्रशासनाला सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुचित घटनाशिवाय कोल्हापूर शहर, जिल्ह्यात बंद शांततेत पार पाडण्यासाठी वरिष्ठाधिकार्‍यांचे प्रयत्न सुरू आहेत.

चार हजारांवर पोलिसांचा फौजफाटा सज्ज

बंद पार्श्‍वभूमीवर शहर, जिल्ह्यात मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक, 2 अप्पर पोलिस अधीक्षक, 6 पोलिस उपअधीक्षक, 31 पोलिस निरीक्षक, 38 सहायक पोलिस निरीक्षक, 97 पोलिस उपनिरीक्षक, 2 हजार 989 पोलिस, 600 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दल व जलद कृती दलाच्या प्रत्येकी तीन तुकड्या असे साडेचार हजारांवर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

 वर्दळीच्या ठिकाणीही कडेकोट बंदोबस्त

मध्यवर्ती बस, रेल्वे स्थानक, बाजारपेठा, धार्मिक स्थळ, पर्यटनस्थळ, प्रमुख चौकांसह जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या फाट्यावर खासगी वेशातील पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, संभाजीनगर, रंकाळा परिसर, तावडे हॉटेल, ताराराणी चौक, शिवाजी पेठ, मंगळवारपेठ, बुधवार पेठेसह अन्य सार्वजनिक ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

 महामार्ग, फाट्यावर करडी नजर

पुणे-बंगळूर महामार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांगली फाट्यावर दोन दिवसांपासून पहारा ठेवण्यात आला आहे. एसटी, बसेसह खासगी वाहनांचे नुकसान होऊ नये, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. इचलकरंजी,जयसिंगपूर, कागल, वडगावला चोख बंदोबस्त शहरासह इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, पेठवडगाव, वारणानगर, कागल, मुरगूड, मलकापूर, गडहिंग्लज, आजरा, नेसरी, चंदगड, गारगोटी आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळीपासून गुरुवारी रात्रीपर्यंत गजबजलेले चौक, महामार्गावर नाकाबंदी करून वाहन तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपासून काही महत्त्वाच्या शहरात पोलिसांनी संचलन केले.