Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Kolhapur › पोलिसांवर दगडफेक करून चोरटे पसार

पोलिसांवर दगडफेक करून चोरटे पसार

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 1:29AMगांधीनगर : वार्ताहर

येथील मेन रोडवरील तीन दुकाने शनिवारी पहाटे चार चोरट्यांनी फोडली. चोरीनंतर पहाटे तावडे हॉटेलच्या दिशेने गेलेल्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न शाहूपुरी पोलिसांनी केला. यावेळी दोन चोरट्यांची झडती घेत असताना त्यांच्या अन्य साथीदारांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस कॉन्स्टेबल महेश गवळी व विजय इंगळे किरकोळ जखमी झाले. याचा फायदा घेत चोरटे कदमवाडीच्या दिशेने शेतवडीत पसार झाले. 

गांधीनगर मेन रोडवरील निगडेवाडी कॉर्नर जवळ रात्री  साडेनऊ ते पहाटे अडीचच्या सुमारास बेल्टस अँड वॉइलेट, रवी एजन्सी व साई डेपो या दुकानांची शटर उचकटून शनिवारी पहाटे चोरी झाली. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच पहारेकर्‍याने दुकान मालक दीपक छाबडीया यांंना फोन करून याबाबत माहिती दिली. दुकानमालक घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या जवळील आणखी दोन दुकाने फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलिसांना याची माहिती दिली. गस्तीवर असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी पोहोचले. 

चोरटे तावडे हॉटेलच्या दिशेने पळाल्याची माहिती कंट्रोलरूमने सर्वत्र कळविली. पहाटे साडेपाचच्या सुमारास तावडे हॉटेलनजीक पेट्रोलिंगला थांबलेले शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल महेश गवळी व विजय इंगळे यांना तनवाणी हॉटेलसमोरून जाणारे दोन संशयित दिसले. दोघांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील पिशवी तपासली असता त्यामध्ये चिल्‍लर  आढळली. त्यामुळे ते दोघे चोरटे असल्याची खात्री झाल्याने गवळी व इंगळे यांनी त्या दोघांना पकडले. त्यांच्या अन्य दोघा साथीदारांनी थेट पोलिस कर्मचार्‍यांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये इंगळे व गवळी किरकोळ जखमी झाले. 

चारही संशयित चोरटे शिरोली टोलनाक्याच्या बाजूच्या शेतात शिरले. गवळी आणि इंगळे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलिसांची जादा कुमक शिरोली टोलनाक्यानजीक दाखल झाली. करवीरचे उपअधीक्षक  गुरवही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहकार्‍यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला. बापट कॅम्प, कदमवाडी परिसरातील शेतात सुमारे दोन तास ही शोध मोहीम सुरू होती; पण चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. कदमवाडी, पंचगंगा नदी परिसर तसेच संपूर्ण महामार्गालगत शनिवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. चोरट्यांचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली.

Tags : Kolhapur,  throw, stones,  Police,  criminals, thieves