Mon, May 27, 2019 06:40होमपेज › Kolhapur › नागमणी आमिषाने लुटणार्‍या तिघांना शिक्षा

नागमणी आमिषाने लुटणार्‍या तिघांना शिक्षा

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नागमणी देण्याचे आमिष दाखवून चौघांना बेदम मारहाण करून 55 हजारांच्या रकमेसह दोन रिव्हॉल्व्हर हिसकावून घेणार्‍या मध्य प्रदेशातील तिघांना न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून प्रत्येकी दोन वर्षे कैद व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांनी ही शिक्षा ठोठावली.

केमासिंग अनीससिंग आदिवासी (वय 22), समीन रासनलाल आदिवासी (21), अमठलाल बदुसलाम आदिवासी (50, रा. बिरोली, ता. रेठी, जि. कठणी, मध्य प्रदेश) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

जानेवारी 2015 मध्ये मध्य प्रदेशातील काही संशयित तरुण कोल्हापूर जिल्ह्यात नागमणी विकण्याचे आमिष दाखवून लूटमार करीत होते. केमसिंग व त्याच्या साथीदारांनी बाजीराव दादू नाईक (33, कळे, ता. पन्हाळा) यांना नागमणी विक्रीचे आमिष दाखविले. नाईकसह दादू आनंदा पाटील यांच्यासह काटेभोगावपैकी पानारवाडी गावच्या हद्दीतील शेतात नेले. यावेळी त्यांच्यासमवेत अर्जुन वंग, दीपक बळवंत हेदेखील होते.

केमसिंग व त्याच्या साथादारांनी नाईक, पाटील यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून 55 हजारांची रक्कम काढून घेतली. दोन रिव्हॉल्व्हरही जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. आरोपींनी त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मीना जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षामार्फत अ‍ॅड. शीतल रोटे यांनी 11 साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकिलांचा युक्तिवाद, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने कलम 395 नुसार 2 वर्षांची कैद, प्रत्येकी 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मुरगूडमधील चौघांना अटक

मुरगूड : येथे 2000 साली मतदार नोंदवताना वयाचे खोटे दाखले वापरल्याप्रकरणी  100 जणांवर गुन्हे नोंद केले होते.  मुरगूड पोलिसांनी सोमवारी सागर महादेव शिंदे (वय 34), गणेश सुखदेव वंडकर (34), जीवन प्रकाश कांबळे (34 ) व सतीश पांडुरंग मेंडके (40, सर्व रा. मुरगूड) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.