Mon, Apr 22, 2019 12:09होमपेज › Kolhapur › दसर्‍यापूर्वी हंगाम सुरू करणे अशक्य

दसर्‍यापूर्वी हंगाम सुरू करणे अशक्य

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:19AMकोल्हापूर : निवास चौगले 

राज्यातील यावर्षीचा साखर हंगाम 1 ऑक्टोबरला सुरू करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख प्रयत्नशील असले, तरी कोल्हापूसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांचा मात्र याला विरोध आहे. दसर्‍यानंतर म्हणजे 1 नोव्हेंबरपासूनच हंगाम सुरू करावा, अशी मागणी या तीन जिल्ह्यांतील कारखानदारांची आहे. 

आज, सहकारमंत्री देशमुख यांनी यावर्षीच्या साखर हंगामासमोरील अडचणी, त्यावरील उपाययोजना यांचा आढावा पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी अतिरिक्त उसाचा प्रश्‍न पुढे करून हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू करावा, अशी मागणी केली. 

राज्यातील एकूण ऊस उत्पादनापैकी 70 टक्के कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत आहे. त्यातील सुमारे 35 टक्के ऊस कोल्हापुरात आहे. 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू झाल्यास तोडणी-ओढणी मजुरांची कमतरता भासणार आहे. यावर्षी दसरा 10 ऑक्टोबर रोजी आहे आणि तोपर्यंत या तिन्ही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे कारखाने सुरू करणे अशक्य आहे. म्हणूनच, संपूर्ण राज्यातच 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी या तीन जिल्ह्यातील कारखानदारांची मागणी आहे. 

दुसरीकडे, या तिन्हीही जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रबळ आहे. या संंंंंघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या उचलीची मागणी किती होणार यावरही हंगाम सुरू कधी होणार, हे अवलंबून आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने संघटनेचे खासदार राजू शेट्टी आंदोलनाच्या माध्यमातून काही तरी पदरात पाडून घेण्यासाठी ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. 

संघटनेची ऊस परिषद कधी हेही जाहीर झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्या निर्णयावरही या तीन जिल्ह्यांतील हंगाम अवलंबून आहे. त्याचा विचार करता 1 नोव्हेंबर हीच तारीख योग्य असल्याची भूमिका कारखानदारांची आहे.