Sat, Jul 20, 2019 11:23होमपेज › Kolhapur › गुड न्यूज... यंदा टंचाई कमीच!

गुड न्यूज... यंदा टंचाई कमीच!

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:26PMकोल्हापूर : नसिम सनदी 

परतीचा पाऊस नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पडत राहिल्याने बर्‍यापैकी पाणीसाठा शिल्लक असल्याने कित्येक वर्षांनंतर यंदा जिल्ह्याला फारशा टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत. तरीदेखील संभाव्य टंचाई गृहीत धरून जिल्हा परिषदेने 110 गावे, 229 वाड्यांसाठी 339 उपाययोजना सुचवणारा व 2 कोटी 34 लाख 9 हजार रुपये निधी मागणीचा टंचाई आराखडा जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे.

जि.प.चा पाणीपुरवठा विभाग भूजल सर्वेक्षण आणि महसूल यंत्रणेने ऑक्टोबर ते जून या आठ महिन्यांचा पाणीटंचाई आराखडा तीन टप्प्यात तयार करून तो मंजुरीसाठी  जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला जातो. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता या आराखड्यापैकी 25 टक्केच आराखड्याला मान्यता मिळते. गेल्यावर्षी 2 कोटी 15 लाखांचा आराखडा पाठवण्यात आला होता. त्यापैकी 21 उपाययोजनांसाठी केवळ 70 लाख रुपयेच मंजूर झाले होते. 

जिल्ह्यात मार्च ते एप्रिल आणि मे ते जून या दोनच टप्प्यात टंचाईची तीव्रता जाणवते. यावर्षी 2 कोटी 34 लाखांचा आणि तब्बल 339 उपाययोजना सुचवणारा आराखडा पाठवला आहे. यात सार्वजनिक विहिरी गाळ काढण्याचे 9 प्रस्ताव आहेत. खासगी विहीर अधिग्रहणाचे 68 प्रस्ताव असून, त्याला 27 लाख 99 हजारांच्या निधीची मागणी केली आहे. नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 16 लाखांचे तीन प्रस्ताव आहेत.  यावर्षी बुडक्या खोदणे व टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याची मात्र वेळ येणार नाही, अशी परिस्थिती आहे. 

राधानगरीतून विंधन विहिरींसाठी सर्वाधिक अर्ज
नवीन विंधन विहिरी खोदण्याचे 248 प्रस्ताव आहेत. यात 208 वाड्या आणि 40 गावांचा समावेश आहे. त्याला 1 कोटी 36 लाख 50 हजारांच्या निधीची मागणी केली गेली आहे. सर्वाधिक विहिरींची मागणी राधानगरीत (47), कागल (42), भुदरगड (37), गडहिंग्लज (26), आजरा (18) येथून आहे. तथापि, या आराखड्यात विंधन विहीर दुरुस्तीचा मात्र एकही प्रस्ताव नाही.