Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Kolhapur › ‘ती’ जागा मनपा हद्दीतच

‘ती’ जागा मनपा हद्दीतच

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 1:22AMकोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमित जागा ही महापालिका हद्दीतच आहे, असा अहवाल महापालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी राज्य शासनाला दिला. राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील कक्ष अधिकारी निकेता पांडे यांनी त्यासंदर्भात 17 एप्रिलला पत्र पाठवून आयुक्‍तांना स्वयंस्पष्ट अहवाल देण्याची विनंती केली होती. आयुक्‍तांनी संबंधित जागा ही कोल्हापूर शहर हद्दीतच असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानेच 22 फेब्रुवारीला दिला असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई करू नये, यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव कैलाश बधान यांनी 17 एप्रिलला स्थगिती आदेश दिले होते. तत्पूर्वी, भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेच्या कारवाईस स्थगिती द्यावी, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 एप्रिलला दिले होते. त्या पत्रावरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ तपासून घ्यावे व स्थगिती द्यावी, असा शेरा मारून स्वाक्षरी केलेली आहे. महाडिक यांच्या पत्राच्या आधारेच कक्ष अधिकारी पांडे यांनी 17 एप्रिलला महापालिका आयुक्‍त चौधरी यांना पत्र पाठविले होते. त्यात महाडिक यांच्या पत्रानुसार बांधकामाविरुद्ध महापालिकने प्रस्तावित केलेल्या कारवाईस स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. प्रधान सचिव (2) यांचा अहवाल कार्यवाहीसाठी यापूर्वीच आपल्याकडे पाठविला आहे. प्राप्त निवेदनातील मुद्दे तसेच अहवालातील निष्कर्षात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने तपासणी करून स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा, असेही पांडे यांनी पत्रात म्हटले होते. त्यानुसार आयुक्‍त चौधरी यांनी तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिका हद्दीतच असल्याचा अहवाल दिला आहे.

Tags : Kolhapur, place, under, municipal, corporation, kolhapur