Tue, Jul 23, 2019 02:03होमपेज › Kolhapur › ...तर शिक्षकांवर कारवाई होणार

...तर शिक्षकांवर कारवाई होणार

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: May 31 2018 11:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बदलीसाठी ऑनलाईन भरलेल्या अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकार्‍यांना शासनाने पाठविले आहे. 
शिक्षकांच्या बदल्यांचे जिल्हा परिषदेचे अधिकार यावर्षी शासनाने काढून घेतले. प्रथमच ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली. पहिल्या टप्प्यात दोन जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या केल्या. यातील त्रुटी पाहून साधारणपणे पंचवीस ते तीस जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या. 

यासाठी शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. बहुतांशी शिक्षकांना  ऑनलाईन अर्ज भरताना अक्षरश: कसरत करावी लागली. कधी सर्व्हर डाऊन असायचा, कधी साईडच ओपन व्हायची नाही, ग्रामीण भागातील शिक्षकांना तर शहरात येऊनच अर्ज भरावे लागले. बदलीस पात्र असेल तर त्या शिक्षकांसाठी वीस शाळा निवडण्याचा पर्याय दिला होता. याशिवाय सेवेत रुजू झालेली तारीख याचीही माहिती भरावयास सांगितली होती. बदलीची प्रक्रिया शिक्षकांना समजून न घेतल्याबद्दल बदलीस पात्र नसलेल्या काही शिक्षकांनी देखील बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांचीही बदली झाली असल्याने ते तक्रार करू लागले आहेत.आलेल्या तक्रारीमध्ये विशेषत: सेवाज्येष्ठता डावलल्याच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. काही शिक्षक जिल्ह्यांतर्गत बदली होऊन आले आहेत.

त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना कोल्हापूर जिल्ह्यात सेवेत आल्याची तारीख लिहिणे अपेक्षित होते. तसे काही जणांनी न केल्यामुळे ज्येष्ठ असणार्‍या शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांनी ऑनलाईन भरलेल्या माहिती तपासून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती अर्जामध्ये भरली असेल त्यांच्यावर वेतनवाढीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.