Fri, May 24, 2019 21:15होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : १८ तोळे दागिने घेऊन भामटा पसार

कोल्हापूर : १८ तोळे दागिने घेऊन भामटा पसार

Published On: Aug 19 2018 1:45AM | Last Updated: Aug 19 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 18 तोळ्यांचे दागिने घेऊन पसार झालेल्या भामट्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश कल्‍लेशा पाटील (रा. सांगली) असे त्याचे नाव आहे. नागपूर विभागात उपविभागीय अधिकारी असल्याचे भासवूनत्याने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात पुढे येत आहे. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत दोन गुन्हे नोंदविण्यात आले. 

शालन प्रकाश पाटील (वय 46, रा. तांबवे वसाहत, पेठवडगाव) यांना 25 जून रोजी संशयित प्रकाश पाटील भेटला. आपण नागपूर विभागात उपविभागीय अधिकारी असून पाटील यांच्या भावाचा मित्र असल्याचे सांगितले.

सोनेतारण ठेवून त्याबदल्यात मोठ्या रकमेचे गृहकर्ज मिळून देतो, असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून शालन पाटील यांनी सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, सोनसाखळी, अंगठ्या, झुबे, कानवेल असा सुमारे 13 तोळ्यांचा ऐवज त्याच्याकडे दिला. यानंतर संशयित प्रकाश पाटीलच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार विचारणा करूनही तो कर्जाबाबत माहिती देत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यामुळे शालन पाटील यांनी फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुंबई येथील राम गणपती भोसले (वय 27, मूळ रा. गडहिंग्लज) याचीही जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदाची नोकरी मिळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या आवारात प्रकार घडला. भोसले यांच्याकडून 5 तोळ्यांचे दागिने भामटा पाटील याने घेतले. याप्रकरणीही गुन्हा नोंदविण्यात आला. 

बनावटशासकीय पत्र

संशयित प्रकाश पाटील याने महाराष्ट्र शासनाच्या नावाने ‘उपविभागीय अधिकारी तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, नागपूर विभाग‘ अशा आशयाचे लेटरहेड तयार केले. याच लेटरहेडवरून त्याने पत्रव्यवहार केल्याने फसवणुकीला अनेकजण बळी पडले आहेत.