Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Kolhapur › चोरट्यांचा राजरोस धुडगूस

चोरट्यांचा राजरोस धुडगूस

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:13AMकोल्हापूर : दिलीप भिसे

मुंबईपाठोपाठ सर्वाधिक उलाढाल असलेल्या ‘गुजरी’तील सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक टिपर, रेकॉर्डवरील फाळकूटदादांना हाताशी धरून गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहे. 

पंधरा-वीस वर्षांत गुजरीतील बड्या व्यावसायिकासह विविध उद्योगांतील किमान पन्नासावर उद्योजकांची गुंडांनी लूटमार केली असली तरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत घटनांच्या नोंदी पोलिस रेकॉर्डला झाल्या आहेत. त्याचाच गैरफायदा घेत लूटमारीच्या घटनांचा आलेख वाढतो आहे.

‘त्या’ लुटीचा अजून सुगावा नाही
ताराराणी चौक, गुजरीत भरचौकात घडलेल्या लूटमारीच्या दोन गंभीर घटनांमुळे सराफी व्यावसायिकांसह अन्य क्षेत्रांतील उद्योजकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ताराबाई रोडवरील सराफी पेढी फोडून सराईतांनी सुमारे 50 लाखांचा ऐवज लुटला. मध्यवर्ती, वर्दळीच्या चौकात ही घटना घडली. तपास यंत्रणांना ‘लुटारू’चे फुटेज मिळूनही वर्षभर टोळीचा छडा लागत नाही.

सुरक्षिततेबाबत बेफिकिरी 
 गुजरीसह शहरात विविध ठिकाणी सराफी पेढ्यासह चांदी कारागीर कार्यरत आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली करणार्‍या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत कमालीची उदासिनता दिसून येते. पोलिसाच्या गस्तीचा तर पत्ताच नसतो. खासगी सुरक्षेततेबाबतही बेफिकिरी दिसून येते. 

अपुरे मनुष्यबळ अन् असुरक्षितता
 जुना राजवाडा पोलिस ठाण्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसर, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, दिलबहार तालीम परिसर, संभाजीनगर बसस्थानकासह फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, अंबाई टँकसह पंचवीसवर उपनगरांचा समावेश आहे. वाढत्या उपनगरांच्या तुलनेत पोलिसांची एकूण संख्या व क्षमता लक्षात घेता तपास यंत्रणांवरही मर्यादा असल्याचे स्पष्ट होते. 2011 च्या जनगणनेनुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख 60 हजार अशी लोकसंख्या गृहित धरली असली तरी पोलिस ठाण्याकडील उपलब्ध मनुष्यबळ तोकडे आहे. अंबाबाई दर्शनासाठी रोज लाखोच्या संख्येने भाविक, पर्यटक दाखल होत असतात. अतिमहत्वाच्या व्यक्तीचा बंदोबस्त, शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी होणारी कसरत, त्यात गुन्ह्यांच्या वाढत्या सत्रामुळे राजवाडा पोलिस ठाण्यातील अधिकारी,कर्मचार्‍यांना तारेवरची कसरतच करावी लागते. 1 पोलिस निरीक्षक, 1 सहाय्यक निरीक्षक, 4 उपनिरीक्षक,95 पोलिस अशी पदे मंजूर असताना अनेक पदे रिक्त आहेत. 
कसबा गेट  पोलिस चौकी ‘असून अडचण नसून...’

महाद्वार रोडवरील कसबा गेट पोलिस चौकीची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच अवस्था आहे. अंबाबाई दर्शनासाठी रोडवर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे भाविकांच्यादृष्टीने ही चौकी रात्रंदिवस कार्यान्वित असणे गरजेचे असताना चौकीला नेहमीच टाळे दिसून येते.‘सदा बंद’ पोलिस चौकी काय कामाची? अशीच प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चौकीसाठी दोन हवालदार आणि चार पोलिसांची नियुक्ती आहे. बंद चौकीमुळे नियुक्त पोलिस कर्मचारी करतात तरी काय? अशीही विचारणा होत असते.

गुजरी व परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा सराफ असोसिएशन व अन्य संस्था, व्यापार्‍यांच्या सहयोगातून सद्यस्थितीत 13 कॅमेरे बसविले आहेत. अजूनही 20 कॅमेर्‍यांची गरज आहे. 

- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक