Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Kolhapur › सिद्धेश्‍वर मंदिरातील दानपेट्या पळविल्या

सिद्धेश्‍वर मंदिरातील दानपेट्या पळविल्या

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 12:58AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील ग्रामदैवत सिद्धेश्‍वर मंदिरातील दोन दानपेट्या  चोरट्यांनी पळवून नेल्या. या चोरीत  पावणेदोन लाखाची रक्कम लंपास केली. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजावरील झडपाची काच फोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार व कलशारोहण, शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आहे. त्यावेळी मोठे दान जमा झाले होते. त्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी  डल्ला मारला. तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत.

मंदिराचे प दिलीप बाळय्या जंगम (वय 57, रा. सिद्धेश्‍वर मंदिर नजीक, 4 थी गल्ली) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री 10 ते शनिवारी पहाटे साडेपाचच्या मुदतीत ही चोरी झाली आहे. पोलिसांनी श्‍वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्‍वान मंदिर परिसरात घुटमळले. ठसेतज्ज्ञ सहायक पोलिस निरीक्षक गायत्री धिरंजे यांनी खिडकीची काच व लगत पहाणी केली. त्यांना काचेवर ठसे आढळून आले आहेत.

मंदिरात एकूण तीन दानपेट्या असतात. एक पुजारी यांची तर दोन पेट्या या सिद्धराज देवालय ट्रस्टच्या असतात. मंदिर पहाटे 5.30 वा.पूजेसाठी व दर्शनासाठी उघडले जाते. शनिवारी पहाटे दिलीप जंगम मंदिरात आले असता त्यांना तीन पैकी दोन दानपेट्या नसल्याचे  आढळले. त्यांनी ट्रस्टचे व्यवस्थापक सचिन कनवाडे यांना माहिती दिली. त्यानंतर ते व मंदिर ट्रस्टी घटनास्थळी आले.

घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील,पोलिस कर्मचारी मंदिरात आले. पंचनामा केला. मंदिरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चोरट्यांचा छडा  लवकरच लावू, अशी ग्वाही दिली. इचलकरंजी एलसीबी एक व जयसिंगपूर पोलिस कर्मचार्‍यांचे दोन अशा एकूण तीन तपास पथक ांची नियुक्ती केली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक शहाजी निकम, पोलिस उपनिरीक्षक किरण दिडवाघ उपस्थित होते.