Fri, Mar 22, 2019 01:54
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › गांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

गांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:46AM

बुकमार्क करा
गांधीनगर : वार्ताहर

गांधीनगर बाजारपेठेपैकी गडमुडशिंगी हद्दीतील लोहिया  मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे 29 दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घालत 10 लाख 20 हजारांची रोख रक्‍कम लांबवली. टोळीने शटर उचकटून ही धाडसी चोरी केली. दरम्यान, चोरीची रक्‍कम केवळ दहा लाख दाखवली असली तरी प्रत्यक्षात 25 लाखांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्‍ला मारल्याची चर्चा घटनास्थळी होती. या प्रकाराने संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेत घबराट पसरली आहे.

गांधीनगर बाजारपेठेतील लोहिया मार्केटमधील व्यापारी बुधवारी रात्री दुकाने बंद करून घरी गेले. महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी झालेल्या पोलिसांच्या दमछाकीचा फायदा उठवत चोरट्यांनी गांधीनगर बाजारपेठेस लक्ष्य केले. लोहिया मार्केटमधील वॉचमन महेश ठाकूर (सध्या रा. गांधीनगर, मूळ रा. नेपाळ) याला दोघा चोरट्यांनी धरले. त्याला काठीने मारहाण करत दहशत करून त्याला गप्प राहण्यास भाग पाडले.   

दहशतीमुळे ठाकूर कोपर्‍यात गप्प बसूनच राहिला. त्यानंतर चोरट्यांनी शटर कटावणीने उचकटत 29 दुकानांना लक्ष्य केले. सोना लाईट हाऊसचे शटर तोडून आत प्रवेश करून कॅश काऊंटर उचकटले व त्यातील चार लाख साठ हजारांची रक्‍कम चोरली. त्याचप्रमाणे अन्य 28 दुकानांमधील पाच लाख 59 हजार 200 रुपयांची रोख रक्‍कमही लंपास केली.

मालक, दुकानाचे नाव आणि चोरी झालेली रक्‍कम अशी : जितुकुमार ग्यानचंद निरंकारी (एस एच फॅशन- एक लाख 75 हजार), अनिल हिरालाल दर्यानी (संजना क्रिएशन- 42 हजार), लालचंद कृपालदास सिंधी (अजित टेक्स्टाईल्स, 25 हजार), चेनाराम कोलारामजी चौधरी (हरिओम गारमेंट- 7 हजार), अजय हरेशलाल राहुजा (रिया गारमेंट- दोन हजार), सूर्यकांत पांडुरंग पांढरपट्टे (यश एंटरप्राईज, 1200 रु.), राजेश चेताभाई चंडेसर (2500 रु.), राजेश किशोरलाल चंदवाणी (गणेश सेल्स कापड दुकान- तीन हजार), राजा रुपचंद वाधवानी, (अमृत ट्रेडर्स- 1500 रु.). याशिवाय चोरीचा प्रयत्न झालेली 20 दुकाने अशी - राजा हरिराम डेंबडा (मोहन फटाका), दयाल मोहनदास रोचानी (गुरुकृपा किटस्), महेश नंदकुमार त्रिजानी (महेश एंटरप्राईजेस), मुकेश नंदकुमार त्रिजानी (महेशकुमार नंदलाल कापड दुकान), रमेशलाल चोईथराम डेंबानी (बुलचंद बावनदास कापड दुकान), अनिल नारायणदास नागदेव (राधे कापड दुकान), किशोर माळी (शिवशक्‍ती टुर्स), वसंत शंकर पाटील (नवनाथ स्नॅक्स), सुनील गजमल चव्हाण (हरि फॅशन), महेश हिराराम पटेल (हरिओम आर्टस्), राजेश गोविंद भियानी (श्री गणेश बेल्ट), दीपक घनशामदास नारवाणी (सुमन एंटरप्राईजेस), मोहनलाल चावला (आकाश कलेक्शन), हरिओम गारमेंट, सुनील आसुदोमल लुल्‍लानी (साई कलेक्शन), अष्टविनायक गारमेंट.

दरम्यान, हा प्रकार सुरू असताना परिसरातील एका व्यक्‍तीला त्याची चाहूल लागली. एका दुकानाचे शटर उचकटल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या व्यक्‍तीने एस एच फॅशनच्या मालकास फोन केला. एस एच फॅशनचे मालक घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली. इतक्यात पलीकडील दुकानात चोरटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गांधीनगर पोलिसांना फोन केला. गांधीनगर पोलिसांची व्हॅन तेथे आली. त्यात पोलिस उपनिरीक्षक अंजली फाळके, हवालदार बालाजी हांगे, डी. एम. माळवी, एस. टी. खंदाळे होते. पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पोलिस मेनरोडवरच थांबून राहिले. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी नजीकच असलेला रेल्वे रूळ ओलांडत पोबारा केला.