होमपेज › Kolhapur › दोन घटनांत २१ तोळे दागिने लंपास

दोन घटनांत २१ तोळे दागिने लंपास

Published On: Aug 24 2018 1:12AM | Last Updated: Aug 24 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रुईकर कॉलनीतील दुकानासमोर लावण्यात आलेल्या मोपेडच्या डिक्कीतून साडेबारा तोळ्यांचे दागिने, तर न्यू पॅलेस परिसरातील वन अधिकार्‍याचे घर फोडून नऊ तोळ्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या दोन घटनांत 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 40 हजारांची रोख रक्कम चोरीस गेली.  

कलाथरन कुमार मेनन (वय 63, रा. महाडिक वसाहत) हे लक्ष्मीपुरीतील बँकेच्या लॉकरमधील साडेबारा तोळ्यांचे दागिने घेऊन घरी चालले होते. दुपारी बाराच्या सुमारास रुईकर कॉलनीत भाजी खरेदी करण्यासाठी ते थांबले. जनता बझारसमोर मोपेड उभी करून पंधरा मिनिटे बाजूला गेले. एवढ्यात अज्ञाताने डिक्की उचकटून त्यातील दागिन्यांची पिशवी लंपास केली. यामध्ये साडेतीन तोळ्यांचा रूबी नेकलेस, तीन तोळ्यांचा लक्ष्मीहार, तीन तोळ्यांची चेन, अडीच तोळ्यांचा पालका नेकलेस व बँकांची पासबुके असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. 

वनाधिकार्‍याचे घर फोडले

न्यू पॅलेस परिसरातील पाटोळे पार्कात राहणार्‍या वनाधिकार्‍याच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 40 हजार लंपास केले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विजय राजाराम खेडकर (वय 38) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. विजय खेडकर वन खात्यात विभागीय अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. न्यू पॅलेस परिसरातील अतुल पाटोळे यांच्या घरी पत्नी व दोन मुलांसह भाड्याने राहण्यास आहेत. ते सकाळी नोकरीला गेले. तर दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांची पत्नी मुलांना शाळेतून आणण्यास गेल्या होत्या. अर्ध्या तासात त्या मुलांना घेऊन घरी परतल्या असता दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता शेवटच्या खोलीतील लोखंडी कपाट उचकटल्याचे दिसले. तसेच प्रापंचिक साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. 

कपाटातील नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज व रोख 40 हजार रुपये चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती फोनवरून पती विजय खेडकर यांना दिली. चोरट्यांनी चार तोळ्यांचे गंठण, दोन सोनसाखळ्या, कानातील टॉप्स, वेल, वळे, पैंजण जोड, चांदीचे कॉईन चोरून नेले. 

अर्ध्या तासात घर साफ

विजय खेडकर यांची पत्नी कांचन खेडकर दुपारी 2.45 वाजता मुलांना शाळेतून आणण्यास घराबाहेर पडल्या. घरापासून शाळा जवळच असल्याने त्या 3.15 वाजता परतल्या. केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केला. यापूर्वी चोरट्यांनी घराची रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.