Fri, Nov 16, 2018 13:59होमपेज › Kolhapur › विद्यार्थ्यांच्या ‘डाटा मायग्रेशन’ला ब्रेक

विद्यार्थ्यांच्या ‘डाटा मायग्रेशन’ला ब्रेक

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 12:32AMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांचे निकाल लांबले. निकाल लागलेल्या काही अभ्यासक्रमांच्या निकालपत्रात त्रुटी आढळल्या. साहजिकच, विद्यार्थी हवालदिल बनले. तक्रारी झाल्या. मग विद्यापीठ प्रशासन कामाला लागले. कारण, प्रवेश आणि परीक्षेसाठी नेमलेल्या जुन्या एजन्सीकडून शेकडो विद्यार्थ्यांचा ‘डाटा मायग्रेशन’ (माहिती हस्तांतरण) झाला नव्हता. यावर परीक्षा विभागाने काम सुरू केले असले तरी अद्यापही हा डाटा परिपूर्ण मिळू शकलेला नाही. 

शिवाजी विद्यापीठातील प्रवेश व परीक्षा प्रक्रियेसाठी 2007-08 पासून एजन्सी नियुक्‍त केली होती. विद्यापीठ स्वत: प्रवेश आणि परीक्षा घेऊ शकते, या भावनेतून या एजन्सीला जुलै 2017 ला थांबवण्यात आले. दरम्यानच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा घेतल्या; पण शेकडो विद्यार्थ्यांची माहितीच हस्तांतरित (डाटा मायग्रेट) झाली नसल्याचे वास्तव उघडीस आले. यानंतर मात्र परीक्षा विभागाचे धाबे दणाणले. कारण, याचा थेट परिणाम निकालापत्रावर होणार होता. यानंतर वेगाने डाटा संकलित करण्याचे काम सुरू झाले. डाटा मायग्रेट नसल्याने बी.कॉम., बी.एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या निकालपत्रांत त्रुटी दिसून आल्या. परीक्षा विभागाला डाटा संकलित करण्याचे हे जादा काम लागल्याने इतर परीक्षा कामावर त्याचा थेट परिणाम दिसू लागला. त्यामुळेच काही निकाल लांबले. आता विद्यार्थ्यांचा काही डाटा आढळून येत नसल्याच्याही तक्रारी आहेत. याबाबत कार्यवाही सुरू आहे.