Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Kolhapur › भविष्यातील जग डिजीटलचे : डॉ. योगेश जाधव (Video)

भविष्यातील जग डिजीटलचे : डॉ. योगेश जाधव (Video)

Published On: Feb 02 2018 2:14PM | Last Updated: Feb 02 2018 2:14PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

भविष्यातील जग हे डिजीटल असणार आहे. जगाच्या कानाकोपर्‍यातील शिक्षण हे इंटरनेटद्वारे घेता येत असल्याने शिक्षण श्रीमंत वर्गाची मक्तेदारी राहणार नसून, सर्वांना समान शिक्षण मिळणार आहे. शिक्षकांना भूमिका बदलून मेंटॉरची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे प्रतिपादन दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संचालक, संपादक डॉ. योगेश जाधव यांनी केले. 

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ९७ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, 'न्यू एज्युकेशन सोसायटी ही कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्राची शान आहे. ९७ वर्षाची परंपरा अबाधित राखणे सोपे गोष्ट नाही. विद्यार्थ्यांची सहभाग पाहता शाळेची गुणवत्ता यातून दिसून येते. वि. दा. करंदीकर शाळेचे माजी विद्यार्थी ही अभिमानाची गोष्ट आहे. आजची मुले ही स्मार्ट आहेत. एखादी कंपनीची गाडी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट सहज हाताळतात, स्मार्ट फोन वापरण्यात हातखंडा आहे. भविष्यात मोठी स्पर्धा असणार आहे. मात्र, शालेय दिवस हे हसण्या-बागडण्याचे आहेत. शाळेतील शिक्षणाबरोबर बाहेरील ज्ञान देणे महत्वाचे आहे. वर्तमानपत्रे, मासिके वाचण्याची सवय विद्यार्थ्यांनी कायमची जोपासली पाहिजे.' 

डॉ. जाधव म्हणाले, 'बेंगलोर येथील एका प्रतिथयश इंग्रजी माध्यमाच्या शाळेने शिक्षणाबरोबर नाट्य कलेला महत्व दिले आहे. ही गोष्ट न्यू एज्युकेशन सोसायटीने काही वर्षांपूर्वीच जाणली आहे. २०२० पर्यंत भारताचे सरासरी वय २९ होणार असून, तरुणाचे प्रमाण अधिक असणार आहे. अशा 
परिस्थितीत कौशल्य विकास कार्यक्रमाचे धडे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यानी गिरवायला सुरुवात केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक विषय सुरू केले पाहिजेत. नवीन जग हे वेगळे असणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण राहणे गरजेचे आहे. भविष्यात येणार्‍या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरातील बल्बद्वारे देखील माहिती पाठविता येणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत सोशल मीडियासह तंत्रज्ञानाचा अवंलब करण्यात आला. आगामी काळात भारतात राजकीय, उद्योग क्षेत्रात याचा उपयोग सुरू होईल.' 

अध्यक्षीय मनोगतात लोहिया यांनी दैनिक पुढारीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या विकासात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी अमृत महोत्सव कार्यक्रमावेळी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाप्रमाणे संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

'याप्रसंगी निवृत्त शिक्षकांचा सत्कार व कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन सागर बगाडे, महेश सूर्यवंशी, वर्षा देशपांडे, स्नेहा फडणीस यांनी केले. संस्थेचे सहसचिव प्राचार्य पी.एस.हेरवाडे यांनी आभार मानले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, सदस्य अनिल लोहिया, डॉ. प्रकाश गुणे, नेमचंद संघवी, उद्योजक संग्राम पाटील, प्रा. एस. के. कुलकर्णी, प्राचार्य एस. एस. चव्हाण, अरुण संघवी, निर्मल लोहिया, डॉ. उत्कर्ष पाटील, नगरसेवक रत्नेश शिरोळकर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव व्हावा पर्यावरणपूरक 
न्यू हायस्कूल व प्रिन्सेस पद्माराजेच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक रोप मल्लखांब व जिमेस्टिक प्रात्यक्षिके सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमातंर्गत श्री गणेश विश्‍वरुप दर्शनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश स. म. लोहिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी दिला. न्यू हायस्कूल मराठी शाखेच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्येची विदारक स्थितीकडे लक्ष वेधले. विमला गोयंका इंग्लिश मिडिमय स्कूलने आदिवासी नृत्य, मूकबधीरने देशभक्तीपर गौरवगीत सादर उपस्थितांची मने जिंकली.