Tue, Apr 23, 2019 05:55होमपेज › Kolhapur › महामार्गांसह अनेक रस्त्यांच्या दुतर्फा कचर्‍यांचे ढीग

महामार्गांसह अनेक रस्त्यांच्या दुतर्फा कचर्‍यांचे ढीग

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:31PMकोल्हापूर : सागर यादव 

कचर्‍याचे ढीग, हॉटेल्सचे खरकटे, वैद्यकीय टाकाऊ इथपासून ते घरात नको असलेला गाद्या, बंद पडलेल्या वस्तू आणि जुन्या बांधकामाची खरमाती अशा गोष्टी थेट सार्वजनिक रस्त्यांच्या दुतर्फा टाकण्याचा चुकीचा प्रकार बिनधास्त सुरू आहे. कचरा कोंडाळ्यातच टाकायचा असतो इतकी साधी गोष्ट लोकांच्या लक्षात कशी येत नाही तसेच शासनाच्या संबंधित विभागाच्या वतीने हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाय-योजना का केल्या जात नाहीत? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. 

धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मूलभूत सुविधा असणार्‍या दळणवळणातील रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्त्यांवरून ये-जा करण्याचा पहिला मान वाहनांना असतो किंबहूना त्यांच्यासाठीच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण- डागडुजी, साईडपट्ट्यांची व्यवस्था, त्यावर वाढलेल्या अनावश्यक तण सद‍ष्य वनस्पतींची तोडणी, दुतर्फा असणार्‍या मोठ्या झाडांची छाटणी, दिशादर्शक फलकांची व्यवस्था अशा गोष्टींची काळजी संबंधित विभागांनी घेणे आत्यावश्यक आहे. मात्र, याबाबत संबंधित विभागात अलबेल कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. 

कचर्‍याच्या ढीगांमुळे दुर्गंधी...

शहराला जोडणार्‍या प्रत्येक रस्त्यांच्या दुतर्फा ठिकठिकाणाहून कचर्‍यांचे ढीग टाकले जात आहेत. आपण निर्माण केलेल्या कचर्‍याची विल्हेवाट न लावता तो आपल्यापासून केवळ दूर करण्यावर प्रत्येकाचाच भर आहे. यासाठी सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा, डोंगर-कपार्‍या, माळांचा वापर होत आहे. यामुळे शहराभोवतीच्या प्रत्येक रस्त्यांच्या दुतर्फा कचर्‍यांचे मोठ-मोठे ढीग पाहायला मिळत आहेत. जुन्या बांधकामाची खरमाती, घरात नको असलेल्या खराब वस्तू, वृद्ध-रुग्णांच्या गाद्या-बेडसीट, खराब औषधे, खराब कपडे यांच्यासह हॉस्पिटल्स व मेडिकलचा वैद्यकीय कचरा, हॉटेल्स-धाबे-खानवळीतील शिल्लक पदार्थ व खरकटे, विविध उद्योग-व्यापारातील वाळू, रासायनिक द्रव्ये, पदार्थ, खराब पार्टस अशा गोष्टी कोणत्याही प्रक्रियेशिवाय बिनधास्त टाकल्या जात आहे. यामुळे या रस्त्यांच्या आसपास राहणार्‍या नागरिकांसह ये-जा करणार्‍या लोकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहण करावा लागत आहे. 

कचर्‍यामुळे अनेक समस्या...

रस्त्यांच्या दुतर्फा टाकण्यात येणार्‍या विविध कचर्‍यामुळे नागरिकांसह, जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी, त्यांच्या गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुत्री-मांजरे यांना या कचर्‍यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या बाजू पट्ट्यांवरच कचर्‍यांचे ढीग असल्याने ये-जा करणार्‍या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.