होमपेज › Kolhapur › ...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाज आरक्षणाचा प्रश्‍न तत्काळ सोडवावा, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा ठोक ठिय्या आंदोलन समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी पत्रकार बैठकीत करण्यात आली. आरक्षणाचा प्रश्‍न मिटत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा देत त्यासाठीची रणनीती निश्‍चित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगून दिलीप देसाई म्हणाले, जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला. संध्याकाळपर्यंत सरकारकडून सकारात्मक निरोप येईल असे वाटत होते; पण असा कोणताच निरोप समन्वय समितीला आला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील घरात बसून पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या दबावाला आम्ही घाबरत नाही. प्रसंगी राज्यातील सकल मराठा समाज संघटनांना एकत्र करून मंत्रालयावर धडक देऊ. जिल्ह्यातील चहाच्या गाडीवाल्यापासून उद्योजकांनी कडकडीत बंद पाळला. पण दारूची दुकाने मात्र सुरू होती. दारू ढोसून मोर्चात येऊन बेवड्यांनी गोंधळ घालावा असे षड्.यंत्र होते, असा आरोपही देसाई यांनी केला.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची आंदोलने बेदखल केली. ते गेंड्याच्या कातडीचे असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी 23 जणांनी बलिदान दिले; याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली नाही, यास ते जबाबदार आहेत. पुन्हा मोर्चाने मुंबईत आलो आणि हिंसक वळण लागल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांचीच राहील. मराठा आरक्षणाच्या  आंदोलनाचा  पुढच्या टप्प्याचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. हर्षल सुर्वे म्हणाले, क्रांतिदिनी बंद हाणून पाडण्याचाही प्रयत्न झाला पण ते अपयशी ठरले. 15 ऑगस्टपासून आरक्षणा लढ्याची धग अधिकच तीव्र करणार. आम्ही आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले. आजचा बंदही कोठेही गालबोट न लावता यशस्वी केल्याचेही सुर्वे यांनी सांगितले. 

वसंतराव मुळीक म्हणाले, दिवसभरात  इतक्या संख्येने मराठा समाजबांधव रस्त्यावर आले, पण मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. मराठा समाजबांधव कोणत्याच दबावाला बळी  न पडता हजारोंच्या संख्येने दसरा चौकातील या सभेला आले. सचिन तोडकर म्हणाले, आम्ही कोणाच्या दडपशाहीला घाबरत नसल्याचे मराठा समाजबांधवांनी क्रांतिदिनी दाखवून दिले. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उमेश पोवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपली लढाई सुरू असून आता माघार नाही. करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात जातीय सलोखा कायम आहे. शांततेतून जिल्ह्याने आज क्रांती घडविली आहे.जिल्ह्यातील गावेच्या गावे ठिय्या आंदोलनात टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत, असेही सांगितले.

पत्रकार बैठकीला मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, अवधूत पाटील, अमित आडसूळ, दिलीप सावंत, शुभम शिरहट्टी, संदीप पाटील यांच्यासह सकल मराठा संयोजन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.