होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण

कोल्हापुरात थॅलेसेमियाचे शेकडो रुग्ण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर ; सुनील कदम

कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन वर्षांत जवळपास पाचशेहून अधिक थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. देशभरातही गेल्या काही वर्षांत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांचे मत आहे. याचा अर्थ थॅलेसेमियाचा विळखा दिवसेंदिवस वाढत जाण्याचा धोका संभवतो. ही बाब विचारात घेता या दुर्धर आणि जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी आणि त्याला अटकाव घालण्यासाठी सामाजिक आणि वैद्यकीय पातळ्यांवर एखादी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

देशाचा विचार करता प्रामुख्याने गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही भाग, केरळ आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. विवाहपूर्व रक्त तपासणीचा अभाव आणि प्रामुख्याने जवळच्या नात्यांतर्गत विवाह होणार्‍या लोकांमध्ये थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे ज्या भागात आरोग्यविषयक सुविधांचा आणि साक्षरतेचा अभाव दिसून येतो, त्या भागातही या रोगाने बर्‍यापैकी पाय पसरलेले दिसून येतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांमध्येसुद्धा या रोगाबाबतच्या माहितीचा अभाव असल्याचे आढळून आलेले आहे. जिथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांनाच या रोगाची माहिती नसेल तर सर्वसामान्य लोकांना या रोगाचे कितपत ज्ञान असेल याचा अंदाज येण्यास हरकत नाही. 

शहरी भागात हळूहळू या रोगाबाबत सामाजिक पातळीवर काही जागृती होत असताना दिसत असली तरी ग्रामीण भागात मात्र या रोगाबाबत कोणत्याही स्वरूपाची जाणीव-जागृती झाल्याचे दिसून येत नाही. मुळात थॅलेसेमिया नावाचा एखादा आजार आहे, हेच ग्रामीण भागातील लोकांना माहीत नसेल तर तो होऊ नये यासाठी दक्षता घेणे तर दूरच. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या रोगाबाबत आणि त्याला टाळता येणार्‍या उपाययोजनांबाबत पायाभूत पातळीवर काम करण्याची गरज आहे. मात्र, अपवादानेसुद्धा ग्रामीण भागात असे काम सुरू असल्याचे आढळून येत नाही.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांवर सातत्याने रक्त संक्रमणाचे उपचार करावे लागतात. त्यामुळे रक्तदान म्हणजे या रुग्णांसाठी तर अक्षरश: जीवनदान आहे; मात्र रक्तदानाच्या बाबतीत शहरी असो की ग्रामीण भाग, आवश्यक त्या प्रमाणात जाणीव-जागृती निर्माण झालेली दिसत नाही. त्याचा परिणाम म्हणून अनेक वेळा आणिबाणीच्या वेळी आवश्यक असलेल्या गटाचे रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागताना दिसते. वेळेवर आवश्यक असलेल्या गटाचे रक्त न मिळाल्यामुळे दगावणार्‍या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब विचारात घेता आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या दृष्टीने रक्ताचे असलेले जीवापाड महत्त्व विचारात घेता गावोगावी मोठ्या प्रमाणात रक्तदानाची चळवळ उभा करण्याची गरज आहे.