Sun, Aug 25, 2019 08:12होमपेज › Kolhapur › तेजस्विनीच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा आनंदोत्सव

तेजस्विनीच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा आनंदोत्सव

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 12:07AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) येथे सुरू असणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हिने सलग दुसरे पदक पटकावून नवा इतिहास रचला. यामुळे क्रीडानगरी कोल्हापुरात गुरुवारी सुरू झालेला आनंदोत्सव थांबलाच नाही. शुक्रवारी तेजस्विनीने सुवर्णपदकाचा वेध घेतल्याने क्रीडाप्रेमी कोल्हापूरकरांचा आनंद द्विगुणीत झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक सकाळी तेजस्विनीच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे आवर्जुन अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.   

तेजस्विनीच्या  एस.एस.सी.बोर्ड परिसरातील घरासमोर क्रीडाप्रेमींनी गर्दी करून तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत, तेजस्विनीचे पती समीर दरेकर यांच्यासह अन्य कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर-पेढे वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे तर भारताचा तिरंगा ध्वज अभिमानाने फडकविण्यात आला. सावंत कुटुंबीयांसोबत क्रीडाप्रेमींनी आवर्जुन सेल्फी घेतले. 

सलग दुसरे पदक...
राष्ट्रकुलच्या नेमबाजी प्रकारात गुरुवारी तेजस्विनीने  50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक पटकाविले होते. याचा आनंदोत्सव साजरा करत असताना दुधात साखर पडावी तसा कोल्हापूरचा आनंद आणि उत्साहाला उधाण आणणारा शुक्रवारचा दिवस उजाडला. तेजस्विनीने आपली यशस्वी कामगिरी अखंड राखत 50 मीटर रायफल प्रकारात अचूक निशाना साधत सुवर्ण पदकाचा वेध घेतला.   

3 राष्ट्रकुल स्पर्धात 8 पदके...
तेजस्विनीने आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत तीन राष्ट्रकुल स्पर्धा खेळल्या असून यात तब्बल 8 पदकांची कमाई केली आहे. 2006 ला ऑस्ट्रेलिया येथील स्पर्धेत 2 सुवर्ण, 2010 ला दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत 2 रौप्य व 2 कांस्य आणि सद्या म्हणजेच 2018 ला गोल्डकोस्ट येथे सुरु असणार्‍या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य अशी पदकांची लयलूट केली आहे. 

तेजस्विनीची यशस्वी वाटचाल...

सन 2004 पासून तेजस्विनीने नेमबाजी (शुटींग) खेळातील राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात आपली यशस्वी वाटचाल अखंड राखली आहे. गुवाहाटी येथे 2007 ला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 7 सुवर्ण पदकांची कमाई तीने केली होती. रांची येथे 2011 ला झालेल्या स्पर्धेत  4 सुवर्ण आणि 2015 ला केरळ येथे झालेल्या स्पर्धेत 2 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी येथे 2010 च्या वर्ल्ड चॅम्पीयन स्पर्धेत 50 मीटर प्रोन प्रकारात सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास तेजस्विनीने रचला आहे.  विवाहानंतरही (2016) तेजस्विनीने आपली यशस्वी वाटचाल अखंड राखली आहे.  

देशाचे नाव असेच उंचावत राहो... 
तेजस्विनीने गेल्या 19 वर्षांपासून नेमबाजी खेळातील आपली यशस्वी वाटचाल अखंड राखली आहे. यामुळे कोेल्हापूरसह महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे नाव जगभरात गाजत आहे. तेजस्विनीकडून भविष्यातही अशीची यशस्वी कामगिरी घडत राहिल आणि देशाचे नाव उंचावेल अशी अपेक्षा तेजस्विनीच्या आई श्रीमती सुनिता सावंत व पती समिर दरेकर यांनी व्यक्त केली. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर तेजस्विनीने नेमबाजी क्षेत्रातील यशस्वी वाटचाल  सुरू ठेवली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत पदकांची लयलूट करत क्रीडानगरी कोल्हापूरचे नाव देशपातळीवर आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे. तेजस्विनीच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा अभिमान आहे. 

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री