Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Kolhapur › उमलत्या कळ्यांचा पळून जाण्याचा आलेख चढताच

उमलत्या कळ्यांचा पळून जाण्याचा आलेख चढताच

Published On: Feb 07 2018 2:23AM | Last Updated: Feb 07 2018 2:23AMइचलकरंजी : आराधना श्रीवास्तव

बदलत्या युगाने एक भलतीच समस्या कष्टकरी वर्गासमोर उभी केली आहे. सर्वच स्तरांवर असणार्‍या स्पर्धेशी उरस्फोड करून रोजचे जगणे ओढणार्‍या या लोकांच्या वयात येऊ पाहणार्‍या मुलींचे घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण घाबरवून टाकणारे आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 160 अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची पोलिस दप्‍तरी नोंद आहे. 

उद्यमनगरी असल्याने वस्त्रोद्योगाशी निगडित निरनिराळ्या लघुउद्योगात आणि यंत्रमाग कारखान्यात काम करणार्‍या कामगार वर्गाची संख्या इचलकरंजीत मोठी आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, नेपाळ या राज्यांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उदरनिर्वाहासाठी आलेला कामगार वर्ग इचलकरंजीत स्थायिक झाला आहे. वाढत्या महागाईशी जगण्याचा मेळ घालण्यासाठी कुटुंबातल्या पती आणि पत्नी अशा दोघांनाही कामासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र आहे.

शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने आणि आपल्या माघारी घर सांभाळले जावे यासाठी अशा कुटुंबांकडून आठवी, दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मुलींवर घराची भिस्त सोपवली जाते. आई-वडील कामासाठी बाहेर पडल्यानंतर अंकुश ठेवणारी जबाबदार व्यक्‍तीच घरी नसल्याने अशा मुली युवक आणि महिलांकडून दाखवल्या जाणार्‍या निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. आधी मैत्री, मग गप्पाटप्पा आणि मग भेटवस्तू.. महत्त्वाचे म्हणजे मोबाईलही असा ऐवज अशा लोकांकडून या मुलींना पुरवला जातो. हा प्रवास मैत्रीकडून तकलादू आणि दिखाऊ प्रेमसंबंधांपर्यंत जातो. त्यामुळे घरच्या बंधनातून बाहेर पडून स्वत:च्या स्वप्नातील संसार उभा करण्याचे स्वप्न या मुलींना पडायला लागते. 

भौतिक सुखाच्या भुलभुलैय्याचे चित्रही अशा मुलींसमोर उभे असते. त्यामुळे नको त्या वयात एकतर मुलांकडून अथवा मुलींकडून लग्नाचे पाऊल उचलण्याचा लकडा लावला जातो. मग स्वप्नातले विश्‍व गाठण्यासाठी काहीबाही कारणे सांगून या मुलींचे घराबाहेर पाऊल पडते ते कायमचेच. 

काम आणि कमाईच्या चक्रात अडकलेले आई-वडील मुलींनी दिलेल्या या अनपेक्षित धक्क्याने कोलमडून जात असल्याचे चित्र आहे. आगतिक आणि हतबल पालक पोलिसात धाव घेऊन दाद मागतात खरी पण तोवर हातची वेळ निघून जाणे, अब्रूचे खोबरे होणे आणि मन:स्ताप पदरी पडणे ते रोखू शकत नाहीत. काही घटना गरिबीने गांजलेल्या कुटुंबातील मुलीला कमाईचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या आणि अशा प्रकरणात तिचे लैंगिक शोषण आणि पिळवणूक झाल्याच्याही आहेत तर काही प्रकरणे मुले अथवा मुलींनी स्वत: पुढाकार घेवून लुटुपुटूचे लग्‍न लावून घेतल्याची आहे.

दोन्ही प्रकारात अशा मुलींच्या आयुष्यासह कुटुंबाचेही आयुष्य बरबाद होत असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे. कारण मुलगी हरवल्याची पोलिस दप्‍तरी नोंद झाल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याने तिने घरातून पळून जाऊन केलेला विवाह बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे मुलीची रवानगी सुधारगृहात आणि मुलावर कायदेशीर कारवाई अशी प्रक्रिया होतेच. यात दोन्हीकडच्या कुटुंबांना प्रचंड मन:स्ताप भोगावा लागतो. विशेष म्हणजे केवळ मुली हरवल्या एवढ्यावरच ही समस्या संपणारी नाही. सोशल मीडिया, भौतिक सुखाचे दिखाऊ चित्र यात उमलत्या कळ्या कोमेजत असल्याचे हे धक्‍कादायक वास्तव आहे!

कारवाईचा पोलिसांसमोरही पेच : देशमुख 

अशा प्रकरणात पळून गेलेल्या मुला-मुली संदर्भातील तक्रार नोंदवण्यात आलेल्या पालकांना काय उत्तर द्यायचे आणि कसा धीर द्यायचा, असा प्रश्‍न असतो. कारण मुलगा आणि मुलगी अशा दोघांवरही कारवाई करणे भाग असते. पळून गेलेल्या मुली अल्पवयीन असूनही त्यांनी विवाह केलेला असल्याने मुलावर कायद्यान्वये लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करणे भाग पडते. मुलांच्या करिअरवर पोलिसी कारवाईचा ठप्पा आयुष्यभरासाठी राहतो. शिवाय चूक नसताना शिक्षा भोगल्याची सलही मनात राहते. 
- शरयू देशमुख (पोलिस उपनिरीक्षक शिवाजीनगर)