Sun, Jul 21, 2019 08:15होमपेज › Kolhapur › तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शिक्षणाची दिशा बदलतेय

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शिक्षणाची दिशा बदलतेय

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:07AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे सध्या जगामध्ये शिक्षणाची दिशा बदलत चालली असून, नव्या पिढीला आता खडू, पाटी, पेन्सिलऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करावा लागणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्यासारखे दुसरे चांगले काम नाही, असे प्रतिपादन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्‍लाप्पाण्णा नडगदल्‍ली यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी नूलच्या सुरगीश्‍वर मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी होते. निडसोशी मठाचे शिवलिंगेश्‍वर महास्वामीजी व रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रास्ताविक प्राचार्य टी. एम. राजाराम यांनी केले. यावेळी डॉ.प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते नडगदल्‍ली यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ देऊन उभयतांना गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार ए. बी. पाटील, शिवलिंगेश्‍वर महास्वामीजी, भगवानगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रा. वैजनाथ महाजन यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत मनोगत व्यक्‍त केले.

डॉ. जाधव म्हणाले, वयाप्रमाणे माणूस जसा प्रगल्भ होत जातो, तसे माणसाच्या आयुष्यात मोजकेच प्रसंग असतात. ज्याचे भाग्य काहींना चांगल्याप्रकारे मिळते. यामध्ये तारुण्यातील 25 वर्षांपर्यंतचा काळ हा रौप्य महोत्सव ठरतो, तर त्यापुढे सोन्याप्रमाणे चकाकून 50 शी गाठल्यानंतर सुवर्ण महोत्सव ठरतो.  त्यानंतर हिर्‍याच्या पैलूप्रमाणे कर्तृत्व सिद्ध करून हीरक महोत्सव होतो. त्यानंतर अमृत महोत्सवाची संधी मिळते. ती आज अण्णांना मिळाली आहे. नूल परिसरातील शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांचे कार्य फारच मोलाचे आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलावर अतिशय अभ्यासात्मक बोलताना डॉ. जाधव यांनी उपस्थितांना शिक्षणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भारतामध्ये पूर्वीपासून शिक्षणाची विद्यापीठे असून, आता जगाने भारताचा आदर्श घेत विद्यापीठांची निर्मिती केली आहे. विज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला असून, आता पुस्तक, वह्या, पाटी गायब होऊन कॉम्प्युटर, लॅपटॉप व टॅब विद्यार्थ्यांच्या हाती आले आहेत. शिक्षणाचा गर्व कोणीही करू नये, अखेरच्या श्‍वासापर्यंत विद्यार्थी बनून राहिल्यास आयुष्यात भरपूर काही शिकावयास मिळेल.

यावेळी स्वामीजींचे आशीर्वचन झाले. सत्काराबाबत कल्‍लाप्पाण्णा नडगदल्‍ली यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी नानाप्पा माळगी, के. एस. जाधव, व्ही. बी. नाईकवाडी, व्ही. एस. कुलकर्णी, बी. जी. काटे, डॉ. एस. के. मुजुमदार, जयसिंग चव्हाण, जितेंद्र शिंदे, श्रीरंग चौगुले, सोमगोंडा आरबोळे, आय.जी. फुटाणे, सरपंच बाजीराव चव्हाण, उपसरपंच कल्‍लाप्पा देसाई, मल्हारराव शिंदे, रवी माळगी यांच्यासह विद्यार्थी, तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नीळकंठ कुराडे व संजय थोरात यांनी, तर आभार के. एम. गाडे यांनी मानले.

नूलला काहीच कमी पडू देणार नाही
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना नूल गावाबरोबर आपले ॠणानुबंध वेगळे असल्याचे नमूद केले. शाळेसाठी कोटींचा निधी खर्च झाला असून, नूल गावातील अन्य विकासकामांसाठी आपण कायमच प्रयत्नशील राहणार आहे. तसेच नूलच्या विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राजकीय पादत्राणे बाहेर काढा
शाळा ही ज्ञानमंदिर असून, या ठिकाणी येताना सर्वांनीच आपली राजकीय पादत्राणे बाहेर काढावीत, म्हणजे याचे पावित्र्य जपले जाईल व नव्या पिढीला चांगले शिक्षण मिळेल. राजकारणापेक्षाही समाजकारणातून अनेक चांगली कामे करता येतात, त्यासाठी फक्‍त चांगली दृष्टी ठेवा, असेही यावेळी डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.