Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Kolhapur › अनुदानाचा मार्ग मोकळा; जाचक अटींमुळे अडचण

अनुदानाचा मार्ग मोकळा; जाचक अटींमुळे अडचण

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:23PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

1 व 2 जुलैला पात्र शाळा व तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून 8419 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना एप्रिल महिन्यापासून वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासनाने आदेश काढताना जाचक अटी व शर्ती घातल्याने नवीन अडचणी वाढल्याची भावना विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांमध्ये आहे. 

कायम विनाअनुदान तत्त्वावरील परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करून 19 सप्टेंबर 2016 रोजी 20 टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनुदान वितरणाचा आदेश शासनाने लोंबकळत ठेवला आहे. 1 व 2 जुलै रोजी घोषित केलेल्या शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे.  राज्यातील 158 प्राथमिक शाळा व 504 तुकड्यांवरील 1417 शिक्षक पदे आणि 631 माध्यमिक शाळा व 1605 तुकड्यांवरील 5373 शिक्षक 2180 शिक्षकेतर कर्मचारी अशी 8419 पदे अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 23 प्राथमिक, माध्यमिक शाळा, वर्ग तुकड्यांचा यात समावेश आहे. 

शासनाने अनुदान आदेश काढताना अनेक नवीन अटी व शर्ती घातल्या आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक सर्व वर्ग प्रगत असावेत. माध्यमिक शाळेचा 9 वी 10 वीच्या वर्गाचा निकाल शंभर टक्के असणे गरजेचे आहे. शाळेच्या शेवटच्या  वर्गातील विद्यार्थी पटसंख्या 30 पेक्षा कमी असेल व दुर्गम, डोंगराळ भागातील शाळांमध्ये शेवटच्या वर्गाच्या विद्यार्थी पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्यास अशा शाळा अनुदानास पात्र असणार नाहीत. 

शाळा जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकनात पात्र केलेली असावी, यासह इतर अटींचा समावेश आहे. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठीच्या अटी शिथिल न केल्यास बहुतांश शाळा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.