Fri, Apr 26, 2019 09:35होमपेज › Kolhapur › मास्तरच गिरवताहेत सावकारीचे धडे!

मास्तरच गिरवताहेत सावकारीचे धडे!

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:15AMकोल्हापूर : दिलीप भिसे

शिक्षक सावकाराच्या दहशतीला कंटाळून नरतवडे येथील एका सामान्य शेतकर्‍याने गळफास लावून घेऊन जीवनयात्रा संपविली. अंगावर काटा आणि मनात चीड आणणार्‍या सावकारशाहीच्या कृत्यांवर कष्टकरी, श्रमजीवींसह सर्वच घटकांतून संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. ज्ञानार्जनासह संस्कारक्षम पिढ्या घडविणार्‍या एका शिक्षकाने सामाजिक तत्त्वांना हरताळ फासून सावकारीची दुकानदारी थाटावी..

राधानगरी तालुक्यात नेमके तेच घडले आहे. सावकारी दहशतीने एका निष्पापाचा बळी घ्यावा. मास्तर तुम्हीसुद्धा... संपत्तीच्या राशीसाठी मास्तराने ‘सावकारी’च्या माध्यमातून शॉर्टकट मार्ग शोधावा..!
जिल्ह्यात सावकारशाही बोकाळली आहे. दरमहा 15 ते 17 टक्क्यांपर्यंत व्याजाचा दणका देत गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळणार्‍या सावकारशाहीला प्रस्थापित राजकारण्यांसह झारीत दडलेल्या प्रशासनांतर्गत शुक्राचार्यांकडून अभय मिळत आहे. परिणामी, सावकारी टोळ्या आणखीन शिरजोर ठरू लागल्या आहेत. हप्ता वसुलीसाठी नामचिन गुंडांना पोसण्याचा जोडधंदाही सावकारीतील उलाढालीने तेजीत आला आहे.

सावकारी विळखा फोफावतोय
कोल्हापूर शहरासह उपनगरे, इचलकरंजी, शहापूर, गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, पेठवडगाव, मलकापूर, कागल, मुरगूड, गारगोटी, चंदगड, नेसरी परिसरात खासगी सावकारीचा विळखा मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. 

स्थावर मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव!
गरजूला खिंडीत गाठून किमती स्थावर मालमत्ता गहाणवट ठेवून त्यावर कर्जाचा पुरवठा करायचा अन् मन मानेल त्या व्याजाची आकारणी करून मालमत्ता कवडीमोल दराने घशात घालण्याचा गोरखधंदा जोमाने सुरू झाला आहे. सावकारीची पाळेमुळे गोरगरिबांच्या मालमत्तांना गराडा घालू लागली आहेत.

गरीब कुटुंबांवर दहशतीची छाया!
राधानगरी तालुक्यातील घटना प्रातिनिधिक स्वरूपात चर्चेत आलेली असली, तरी जिल्ह्यात अनेक गोरगरीब कुटुुंबे, श्रमजीवी, कष्टकरी घटक सावकारांच्या दडपणाखाली जीवन कंठत आहेत. इचलकरंजीत गेल्या पाच महिन्यांत दोघांनी मृत्यूला कवटाळले आहे. जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाडात सावकारी टोळ्यांची दहशत प्रकर्षाने दिसून येते. औद्योगिक वसाहतीत तर पगार काळात हप्ता वसुली ठेकेदारांचा प्रवेशद्वारावरच ठिय्या पडलेला दिसून येतो.

सरकारी बाबूंनाही लागलीय चटक!
सावकारी म्हणजे विनासायास दरमहा मुबलक कमाई करून देणारे आर्थिक स्रोत ठरल्याने गुंडापुंडांसह राजकारणी, इस्टेट ब्रोकर अगदी सरकारी कचेर्‍यांतील सरकारी बाबूंनाही सावकारीतील मिळकतीची चटक लागून राहिली आहे. हा व्यवहार काही लपून राहिलेला नाही. नरतवडेतील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न झाल्यास सावकारीतील उलाढालीची धक्कादायक व्याप्ती निदर्शनास येईल. 

जिल्ह्यात 27 सावकारांना ठोकल्या बेड्या
सावकारशाहीविरुद्ध पोलिसांनी जिल्ह्यात कारवाईची मोहीम सुरू केली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सावकारी दहशतीला कंटाळलेल्या श्रमजीवी घटकांनी निर्भयाने पुढे येण्याचे आवाहन केले होते. दीड वर्षात मुंबई सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत 21 गुन्हे दाखल झाले. जिल्ह्यातील 27 सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर, इचलकरंजी, पेठवडगाव, जयसिंगपूर, कागल, चंदगड येथील सावकारांचा समावेश आहे.

मूक संमतीने सराईत टोळ्यांची चलती
सावकारीतील उलाढालीत दहशतीला महत्त्व देण्यात येत आहे. कर्जदार व त्याच्या कुटुंबीयांवर दहशत माजविल्यास व्याजासह मुद्दलाची रक्कम आपसुक बिनबोभाट मिळते. हा त्यांचा शिरस्ता आहे. त्यामुळेच सावकारांनी नामचिन टोळ्यांना कमिशनवर जबाबदारी सोपविली आहे. ग्रामीण भागात हे प्रकार निदर्शनास येत आहेत. अर्थात, स्थानिक पोलिस यंत्रणांच्या मूक संमतीमुळेच सराईत टोळ्यांची चलती सुरू झाली आहे.