Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Kolhapur › पात्रता ‘आचार्या’ची, शासनकृपेने झाला ‘आचारी’!

पात्रता ‘आचार्या’ची, शासनकृपेने झाला ‘आचारी’!

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 7:29AMकोल्हापूर : सुनील कदम

शासनाने 2012 सलापासून राज्यातील शिक्षक भरतीवर निर्बंध घातले होते. कालांतराने शिक्षक भरती सुरू झाली, त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या गेल्या; पण पुढे काहीच झाले नाही, असे बर्‍याचवेळा होताना दिसत आहे. शासनाच्या या लालफितीच्या कारभारामुळे शिक्षक होण्याची शैक्षणिक पात्रता असतानाही अनेक तरुणांना हॉटेलमध्ये आचारी, वेटर आणि अन्य पडेल ती कामे करून आपली गुजराण करण्याची वेळ आली आहे, तर शेकडो तरुणांना नाममात्र वेतनावर तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे.

राज्य शासनाने शिक्षक भरतीवर निर्बंध लादल्याने आजघडीला राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या जवळपास 23 हजार जागा रिक्त आहेत. याशिवाय प्राध्यापकांच्या जवळपास 9 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. याशिवाय सन 1980 ते 85 च्या दरम्यान शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून भरती झालेले हजारो शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर राज्याला जवळपास पन्नास हजारांवर शिक्षक आणि प्राध्यापकांची तातडीने गरज भासणार आहे.

शिक्षक भरतीतील गैरप्रकार आणि खासगी संस्थाचालकांची मनमानी रोखण्यासाठी राज्य शासनाने भरतीसाठी संयुक्त परीक्षा पद्धती सुरू केली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षी शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली. 67 केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी राज्यातील जवळपास दोन लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकालही जाहीर झाला, मात्र ही परीक्षा देऊन पास झालेल्या किती विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून नियुक्तीपत्रे मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. रात्रंदिवस राबून, अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवणार्‍या परीक्षार्थींच्या पदरात काहीच पडणार नसेल तर कालांतराने विद्यार्थ्यांचा या परीक्षेवरील विश्‍वासही उडायला वेळ लागणार नाही. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही परीक्षार्थींनी मध्यंतरी आंदोलनही छेडून पाहिले, मात्र अजून तरी शासनाला जाग आलेली नाही.

संबंधित : 

मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’ची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?

परीक्षार्थींच्या वाट्याला सामाजिक हेटाळणी!

सरस्वतीच्या लेकरांचा ‘भाकरी’साठी आक्रोश!

या शासकीय दिरंगाईचा नेमका फायदा राज्यातील काही खासगी शिक्षण संस्थाचालकांनी उचललेला दिसत आहे. वैयक्तीक मान्यता आणि नाहरकत प्रमाणपत्रांच्या आधारावर अशा संस्था चालकांनी शिक्षक भरती बंदीच्या कालावधीत शिक्षकांच्या शेकडो जागा भरून टाकल्या आहेत. हा प्रकार स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे शिक्षक भरती बंदीच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी खासगी संस्थाचालकांनी भरलेल्या जागा रद्द करून त्या ठिकाणी स्पर्धात्मक पध्दतीने भरती व्हावी, अशी अनेक स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे.