Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Kolhapur › शिक्षक दिन : गुरुंमुळे आयुष्यातील संकल्प पूर्णत्वास

शिक्षक दिन : गुरुंमुळे आयुष्यातील संकल्प पूर्णत्वास

Published On: Sep 05 2018 10:23AM | Last Updated: Sep 05 2018 10:18AMकोल्हापूर : राजाराम कांबळे

माझ्या जीवनाला खरे महत्त्व प्राप्त झाले ते गुरुमुळेच. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई वडील हे आद्य गुरु पण नंतर व्यक्तीचा  समाजात प्रवेश होतो तेव्हा समस्त समाज हा गुरूंप्रमाणे मार्गदर्शक ठरत असतो. माझ्या जीवनात गुरूचं स्थान खूप महत्त्वाच आहे ,आज मी जो काय आहे तो केवळ गुरूंनी ज्ञानरूपी दिलेल्या शिदोरीमुळेच.  

गुरू प्रती आदर भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. हा दिन खूप महत्वाचा आहे. मी प्राथमिक शाळेत असताना मला वै. भै. चांदेकर, विठोबा गावडे, चंद्रशेखर जोशी , रेडेकर गुरुजी, दाणी बाई, स्वाती पाटील बाई अशा अनेक प्राथमिक शाळेतील गुरूवर्यानी आमच्या जीवनाची भक्कम पायाभूत तयारी भक्कम केल्यामुळे आज मी या समाजात सक्षमपणे उभा राहू शकलो. आपणास आकार देण्यात महत्त्वाचं योगदान  प्राथमिक शाळेतील शिक्षक करत असतात. पुढे एक चांगला व आदर्श नागरिक बनण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील शिक्षण कारणीभूत ठरले.


माझ्या आयुष्यात वैजू भैरू चांदेकर गुरुजीचं स्थान अग्रस्थानी आहे. कारण त्यांचा दरारा इतका होता की गुरुंजीच नाव घेतल तरी वर्ग हादरायचा. कडक शिस्तीचे, अंगात पांढराशुभ्र सदरा व धोतर, डोक्यावर टोपी, हातात छ्त्री घेऊन सायकलवरून येणारं गुरुजींच व्यक्तिमत्व प्रचंड प्रभावी. कडक असणारे गुरुजी साऱ्या शाळेतील, गावातील मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असत. कडक शिस्त लावण्यामुळे माझ्या वडीलांनी त्यांच्या माराला घाबरून शाळेला रामराम ठोकला. पण योगायोग म्हणा वा माझे सुदैव म्हणा मला पहिलीपासून चौथीपर्यंतच्या काळात माझ्या वडिलांचेच गुरुजी लाभले, त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला आकार मिळाला. त्यांची शिकवण, अभ्यास करून घेणं, पाढे पाठ करून, म्हणवून घेणं अशी त्यांची वेगळीच शिक्षण - पद्धत होती. या सर्व गोष्टी इतक्या शिस्तबद्घ होत्या या शिस्तीमुळे आम्हाला खरं उभा राहता आलं. शिक्षणाचं महत्व याच काळात कळायला लागलं. या ज्ञानसामर्थ्याची जाणीव याच गुरूजीनी आम्हांला बालवयात करून दिली. त्यांचं भरभरून देणं हेच आमचं शिक्षण होत. एकूणच ते खूपच माझ्या आयुष्याला मार्गदर्शक ठरले. त्यांच्या अनंत आठवणी आजही स्मरणात आहेत त्यातील काही गोष्टी इथे मुद्दाम सांगू इच्छितो.

चांदेकर गुरुजी कडक होते. खूप मारायचे. अभ्यास नाही केला, पाढे पाठ नाही केले तर ही सर्व वर्गाला ठरलेली शिक्षा. त्यामुळेच बरीचशी मुलं शाळेला यायचं तर अभ्यास करूनच असं समीकरण होत. पण काही मुलांनी या माराला घाबरून शाळा सोडली. त्यात माझे वडील सांगतात की आपणही लहानपणी गुरूजींच्या माराला घाबरून शाळा सोडली. गुरूजींच्या हयातीत कधीही माझ्या वडीलांना समोर उभे राहायचे धाडस झाले नाही. आदराने खूप दूरवरुन नमस्कार करायचे. पण मला मात्र गुरूजींच्यापासून दूर करायचं नाही असं ठरवून शाळेत घातलं आणि गुरुजींना माझ्यावर जातीने लक्ष ठेवायला वडीलांनी सांगितल. त्यामुळे मी गुरुजींच्या लक्षात राहिलो. मी सुरूवातीला शाळेत घाबरत घाबरत जात होते. नंतर अभ्यासात गुरुजींनी मन गुंतवलं. खूप छान-छान गोष्टी सांगत त्यामुळे शाळा, शिक्षण आवडायला लागले. मग मात्र शाळेत रमलो ते कायमचा शाळेतला झालो. माझ्या वडीलांनी गुरूजींना सांगून ठेवलं होतं की काहीही झालं तरी आम्हाला सैल सोडायच नाही. आपण शिकू शकलो नाही त्यामुळे आपली दयनीय परिस्थिती झाली. आम्हांला त्याचा पश्चाताप होतोय पण माझ्या मुलांनी शिकून डॉ.बाबासाहेबासारखं मोठं व्हावं ही साधी विचारसरणी. 

आम्ही आपले चांदेकर गुरूजीच्या सहवासात ४थीपर्यंत खडतर प्रवास केला. या काळात आम्हाला खूप मार खावा लागला. पण एक ठाम निश्चय केला होता की काहीही झाल तरी गुरुजींच्यासारख शिकून मोठ व्हायचं आणि मारके मास्तर व्हायचे. मोठ झाल्यावर  गुरूजींच्यासारख मुलांना मारता येतं अशी  तेव्हा माझ्या बालमनाची ठाम समजूत झाली होती. मी मनापासून शिकायच ठरवलं आणि मग शिक्षण प्रवासाला आरंभ झाला ते आजपर्यंत सुरूच आहे. 

आज सिनियर कॉलेजच्या मुलांचा मास्तर झालो. पाठीमागे वळून पाहताना माझे मला आश्चर्य व नवलही वाटते. आपण लहानपणीच जे काही संकल्प वा निश्चय केलेले होते ते आज आपले  पूर्ण झाले. त्याचे सारे श्रेय गुरूंना देतो अनेक गुरु यावेळी काटेरी वाटेवरून जाताना योग्य दिशा देत होते. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन जाताना अनेक संकटे, अरिष्ट, वादळे आली पण या सर्वांतून मार्ग काढण्याची शक्ती म्हणजे माझे गुरु होत. कोणतीही गोष्ट अशक्य नाही ही शिकवण नेहमी होती

संत तुकाराम म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास I या प्रमाणे मला सर्व संकल्प पूर्ण करण्याचे ज्ञानसामर्थ प्राप्त झाले आणि अनेक गोष्टी पूर्णत्वास जावू शकल्या. आज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड येथे वरिष्ठ महाविद्यालयात एकवीस वर्षे मराठीच्या सहायक प्राधापक पदावर काम करतोय .त्याचे सारे श्रेय आतापर्यंत लाभलेले सर्व गुरूजन वर्ग होय. हेच माझ्या जीवनात एकमेव बळ होय. माझ्या आयुष्याला दिशा देणा़ऱ्या, बिघडता बिघडता मार्ग दाखविणाऱ्या सर्व गुरुंचे पाठबळ मोलाचे होते.  या प्रवासातील तमाम सर्व गुरूच्यामुळे मी घडू शकलो. नवी ओळख निर्माण करण्याच बळ शिक्षणामुळे होते  गुरूंच्यामुळे होते. म्हणूनच माझ्या संपूर्ण जीवनाला मार्गदर्शक ठरलेल्या तमाम सर्व गुरूंच्या चरणी मी शिक्षक दिन दिवशी नतमस्तक होतो. त्यांचे स्मरण अखंड करतो. सर्व गुरूंप्रती माझा साष्ठांग दंडवत.

प्रा.डॉ.आर.डी. कांबळे
सहाय्यक अधिव्याख्याता,
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड, 
ता. चंदगड, जि. कोल्हापूर