Fri, Jul 19, 2019 14:26होमपेज › Kolhapur › जीवनाला खऱ्या अर्थाने वळण देणारे चव्हाण आणि आय जी शेख सर 

जीवनाला खऱ्या अर्थाने वळण देणारे चव्हाण आणि आय जी शेख सर 

Published On: Sep 05 2018 11:13AM | Last Updated: Sep 05 2018 11:12AMअक्षर आणि अंक ओळख तर सर्वच गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना करून देतात. खऱ्या अर्थाने भाषेची थोरवी ज्यातून समजते, त्या साहित्याची आपल्या विद्यार्थ्यांना  प्राथमिक स्तरावर ओळख व्हावी यासाठी धडपडणारे बाबुराव पांडुरंग चव्हाण, गुरुजी नेहमीच आठवतात. प्राथमिक शाळेत असतानाच त्यांनी आम्हाला मृत्युंजय, श्रीमानयोगी, ययाती, गड आला पण सिंह गेला अशा थोर साहित्यकृतींचा आस्वाद दिला. शाळेत ग्रंथालय नव्हते तरीसुद्धा कोठूनही शोधून आणून त्यांनी वाचनाची चटक लावली. एकदा शालेय तपासणी वेळी, तर चक्क तपासणी अधिकाऱ्यांनी याबद्दल समज दिली होती. आज मुद्दाम अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. पण १९८५/८६ च्या काळात हा गुन्हा समजला गेला. त्या शिदोरीवर पुढे साहित्य क्षेत्रात वाटचाल सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. 

प्राथमिक शाळेत आमच्या वेळी पदवीधर शिक्षक जे इंग्रजी विषयाचे ज्ञानदान करतात. ते लाभले नाहीत. मात्र माध्यमिक शाळेत आठवीत दाखल झाल्यावर आय. जी.शेख नावाचा अवलिया लाभला. आम्ही १३ वर्गमित्र इंग्रजीतले ठोंबेच होतो. शेख सरांच्या ब तुकडीत दाखल झालो. त्यांनी आपल्या इंग्रजी ज्ञानाचे भांडार आमच्यासाठी खुले केले. अगदी सहामाही परीक्षेपर्यंत इंग्रजी व्याकरणाची अशी तयारी करून घेतली की, अ वर्गातील बऱ्याच मुलांना मागे टाकून आम्ही ब तुकडीतील मुलांनी बाजी मारली. ती दहावीपर्यंत. दहावीत पहिले तीन गुणानुक्रम ब मधील मुलांचेच होते.

आज ज्ञानसंवर्धनासाठी पुस्तकांबरोबरच माणसे आणि निसर्ग वाचला पाहिजे, हे तत्वज्ञान त्यांच्या मार्गदर्शनातूनच आमच्या अंगी बाणले आहे.आम्ही ते आपल्यापरीने पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हीच त्यांच्या ऋणातून अंशत: का असेना मुक्त होण्याची संधी लाभली आहे. आजच्या शिक्षकदिनी जीवनाला आकार देणाऱ्या या गुरूजींना शतश: वंदन

- चंद्रकांत काशिनाथ निकाडे, मुख्याध्यापक