Wed, Apr 24, 2019 19:41होमपेज › Kolhapur › कटिंग चहा

कटिंग चहा

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:41AM

बुकमार्क करा


कोल्हापूर : प्रतिनिधी

मित्रांसोबत गप्पांचा फड असो किंवा तलप आली म्हणून असो अथवा कंटाळवाना मूड फ्रेश करण्यासाठी.... प्रसंग कुठलाही असो कोल्हापूरकरांचा मूड ठिक होतो तो मस्त कटिंग चहाने. पण कोल्हापूरकरांना कुठलाही चहा चालत नाही, त्यांना आवडणार्‍या टपरी अथवा हॉटेलमध्येच ते जाणार. कोल्हापूरकरांच्या ‘गोड ’क्षणाचे शहरात अनेक टपर्‍या हॉटेल्स् साक्षीदार आहेत.

चहा हा अगदी जन्मापासून ओपन फॉर ऑल कॅटगिरीतला आहे. गप्पांची मैफल जमावी अगदी कँटिनपासून घरापर्यंत, गच्चीपासून कट्ट्यांपर्यंत कुठेही. गप्पा रंगात येताच कपापासून ते काचेच्या ग्लासापर्यंत कशातही हे वाफाळलेलं जीवनामृत समोर यावे, मित्रांच्या सोबत सुरेल तार जुळताना तो चहाचा घोट घशातून हृदयात जाताना  चहा विरघळलेल्या साखरेप्रमाणे आणि मिळून आलेल्या चहा पत्तीप्रमाणे आपणही विरघळतो. त्या वातावरणात आणि आपल्या आप्तजनात. 

फक्‍कड चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरवातचं होत नाही. दिवसभराच्या कामाचा थकवाही चहाच्या एका घोटामध्ये निघून जातो. नुसत्या नावाच्या उच्चाराने आपल्याला तरतरीत करणारे पेय म्हणजे चहा. 

पाण्याच्या खालोखाल लोकप्रिय ठरलेले हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पेय आहे. पूर्वी आरोग्यवर्धक असा गवतीचहा घालून केलेला गुळाचा चहा इथंपासून आजचा ग्रीन टी, लेमन टी पर्यंतचा चहा इतिहास रंजक आहे. चहाच्या या बदलत्या प्रकारानुसार ते पिण्याचे साधनही बदलले, म्हणजे सुरुवातीच्या काळात जर्मनच्या ताटलीत चहा पिणारे आपण वाटी, कप, काचेचा ग्लास, आणि आता चहाचा मग असे स्वरूप आहे.