Fri, Feb 22, 2019 00:21होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसरप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

तावडे हॉटेल परिसरप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: May 01 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील जागेप्रकरणी उचगाव ग्रामपंचायतीने सुप्रीम कोर्टात (सर्वोच्च न्यायालय) दाद मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारीला संबंधित जागा महापालिका हद्दीत असल्याचा निकाल दिला असून, उचगाव ग्रामपंचायतीने त्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर महापालिकेने तावडे हॉटेल परिसरातील सुमारे अडीचशे एकर जागेवर 

आरक्षण टाकले आहे. यात कचरा डेपो, ट्रक टर्मिनससह इतर आरक्षणांचा समावेश आहे. त्यापैकी काही जागांसाठी महापालिकेने संबंधितांना टीडीआरही दिलेला आहे. आरक्षित जमिनीवर अनेकांनी इमारती उभारल्या आहेत. त्यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने बांधकांमासाठी ना हरकत दाखले दिले आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने संबंधित जागा महापालिका हद्दीत असल्याने सुनावणी घेऊन त्या इमारती बेकायदेशीर ठरविल्या आहेत. त्यानंतर जिल्हा न्यायालयात उचगाव ग्रामपंचायतीने दाद मागितली होती. परंतू, न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला.

2014 मध्ये महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत होती. काही इमारती पाडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2014 मध्ये महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देऊन ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 19 मिळकतधारकांनी बांधकामे केली आहेत. 22 फेब्रुवारी 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिका हद्दीतच असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच 2014 नंतरच्या इमारती बेकायदेशीर ठरविल्या आहेत.

दरम्यान, तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमित जागा ही महापालिका हद्दीतच आहे, असा अहवाल महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 25 एप्रिलला राज्य शासनाला दिला. राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील कक्ष अधिकारी निकेता पांडे यांनी त्यासंदर्भात 17 एप्रिलला पत्र पाठवून आयुक्तांना स्वयंस्पष्ट अहवाल देण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी संबंधित जागा ही कोल्हापूर शहर हद्दीतच असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानेच 22 फेब्रुवारीला दिला असल्याचेही अहवालात म्हटले आहे.