Wed, Mar 20, 2019 09:03होमपेज › Kolhapur › तालुका दूध संघांची पुन्हा चर्चा

तालुका दूध संघांची पुन्हा चर्चा

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:33AMकोल्हापूर : निवास चौगले

तालुका पातळीवर स्वतंत्र दूध संघ असावेत, या हेतून तत्कालीन राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी तब्बल 13 वर्षांनी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. 

काँगे्रस आघाडी सरकारने 2005 मध्ये तालुका दूध संघ सुरू करण्याबाबत आदेश काढले. सुरुवातीला यासाठी 80 हजार लिटर दूध संकलनाची अट होती. हळूहळू ही मर्यादा कमी करून 20 लिटर दूध संकलन असलेल्या संघांना तालुका संघ म्हणून मान्यता देण्याचे ठरले. शासनाच्या या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा दूध संघासह (गोकुळ) कात्रज डेअरी, सोलापूर व नगर जिल्हा दूध संघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

सध्या दूध संकलनाची त्रिस्तरीय व्यवस्था आहे. प्राथमिक दूध संस्थांत संकलित केलेले दूध थेट जिल्हा दूध संघाकडे पाठवण्यात येते. तेथून ते महानंद या राज्यस्तरीय संघाकडे पाठवले जाते. ही व्यवस्था बदलून ती चारस्तरीय करण्यात येणार होती; पण या व्यवस्थेमुळे जिल्हास्तरावर काम करणार्‍या संघासमोर अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत. याशिवाय तालुकास्तरावर राजकारणाचा केंद्रबिंदूही हे संघ ठरण्याची शक्यता गृहीत धरून गोकुळसह चार जिल्हा संघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

उच्च न्यायालयात गेल्या 13 वर्षांत यावर सुनावणीच झाली नव्हती. गेल्या आठवड्यात मात्र ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यात सरकारला म्हणणे सादर करण्यास सांगण्यापलीकडे काही झाले नाही. तथापि, या निमित्ताने तालुका दूध संघाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. यावर सरकार काय म्हणणे सादर करणार यावर पुढील निर्णय अवलंबून आहे.