Fri, Jul 19, 2019 18:43होमपेज › Kolhapur › करवीर तहसीलचे नूतनीकरण कधी?

करवीर तहसीलचे नूतनीकरण कधी?

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:31PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुसज्ज प्रशासकीय भवन साकारण्यात आले आहे. मात्र, करवीर तहसील  कार्यालय अद्यापही जुन्या वास्तूतच सुरू आहे. तहसील कार्यालय व पोलिस ठाणे यांचा कारभार एकाच ठिकाणाहून सुरू असल्याने अनेकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तहसील कार्यालयाचे नूतनीकरण कधी होणार? असा सवाल कर्मचार्‍यांसह नागरिकांतूनही उपस्थित केला जात आहे. कार्यालयाचे नूतनीकरण अथवा स्थलांतराचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

करवीर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाणे एकाच आवारात आहे. जुन्या इमारतीत असणार्‍या या दोन्ही कार्यालयांची अवस्था दयनीय आहे. करवीर तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी वर्दळ असते. या कार्यालयात आजही फाईलचे गठ्ठे दिसून येतात, तर पत्र्याच्या ट्रंकमध्ये आजही जुनी कागदपत्रे आढळून येतात. जुन्या अभिलेख विभागातील फरशा निखळून पडल्या आहेत. कार्यालयांतर्गत एक-दोन बाक सोडल्यास नागरिकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही, तर पुरेशी बैठक व्यवस्था दिसून येत नाही. 

कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. शौचालयाचा पत्ता नाही. पिण्यासाठी पाणी नाही. कार्यालयात येण्यासाठी रस्ते व्यवस्था नाही. ड्रेनेजलाईनची पाईप आणि ड्रेनेजचे चेेंबर दरवाजातच असल्याने दरवाजातून आत जाताना धडपडतच जावे लागते. अपंगांचे वाहन यावरून जाणे कठीण आहे. कार्यालयाच्या मागील बाजूच्या परिसराची दुरवस्था झाली आहे. मोठ-मोठे खाचखळगे आणि दगडांनी हा परिसर भरून गेला आहे. चालताही येत नाही. तेथे दुचाकींचे पार्किंगही करण्यात येत असल्याने गोंधळात आणखी भर पडत आहे.

सभोवताली केबिन्स, मध्यभागी दुचाकी पार्किंग अशा स्थितीत नागरिकांना पायवाट काढून तेथे जावे लागते. कार्यालयाच्या मागील बाजूस जाण्यासाठी कार्यालयाच्या दक्षिण बाजूने एक रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरही दुचाकी पार्किंगची व्यवस्था असल्याने एकीकडे दुचाकींचे पार्किंग आणि दुसरीकडे केबिन्स अशी अवस्था झाली आहे. या भागातूनही नागरिकांना कसरत करत जावे लागत आहे. या कार्यालयात होणारी गर्दी, दररोज असणारी नागरिकांची वर्दळ याचा विचार करून कार्यालयाचे नूतनीकरण, रस्ता डांबरीकरण, रस्ता मोकळा करणे आदी कामे हाती घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे; अन्यथा कार्यालयाच्या दारातच एखादा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.