Tue, Jul 16, 2019 14:17होमपेज › Kolhapur › जिल्ह्यावर स्वाईन फ्लूचे सावट 

जिल्ह्यावर स्वाईन फ्लूचे सावट 

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:03AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूर जिल्ह्याला डेंग्यूने विळखा घातला आहे. त्यातच आता स्वाईन फ्लूचेही सावट निर्माण झाले आहे. दहीहंडी (गोकुळ अष्टमी), गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 25 संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी चौघांना स्वाईन फ्लू झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात स्वाईन फ्लूने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत 302 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी तब्बल 152 रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात कोल्हापूर शहरातील 45, तर जिल्ह्यातील 107 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 37 रुग्णांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. यात कोल्हापूर शहरातील 7 व जिल्ह्यातील 30 जणांचा समावेश होता. 2016 मध्ये स्वाईन फ्लूचा फैलाव झाला नाही. आढळलेल्या 36 संशयित रुग्णांपैकी कोल्हापूर शहरातील फक्‍त एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले. 
गेल्यावर्षी मात्र स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला होता. तब्बल 486 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 248 रुग्णांना तपासणीअंती स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले.

यात कोल्हापूर शहरातील 71 रुग्ण व जिल्ह्यातील 177 रुग्णांचा समावेश होता. कोल्हापूर शहरातील 5 व जिल्ह्यातील 42 अशा एकूण 47 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच आता दहीहंडी, गणेशोत्सवही काही दिवसांनी आहे. कोल्हापुरात हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कोल्हापूर शहरात तर दहीहंडीला हजारोंची गर्दी असते. 

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिक येतात. त्यामुळे शहराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप येते. त्यानंतरही पुन्हा दसरा, दिवाळी आदी सण-उत्सव आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात आली आहे. सीपीआरमध्ये स्वाईन फ्लू रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, व्हेंटिलेटरसह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटमध्येही उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात केले आहे. 

स्वाईन फ्लूची लक्षणे अशी...
तीव्र स्वरूपाची घसादुखी, सर्दी, ताप, कणकण, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, मळमळ, संडास व धाप लागणे.