होमपेज › Kolhapur › स्वाती शिंदे ‘महापौर केसरी’ची मानकरी

स्वाती शिंदे ‘महापौर केसरी’ची मानकरी

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:16AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

खुल्या गटात रंगलेल्या अंतिम लढतीत मुरगूडच्या स्वाती शिंदे हिने  राजर्षी शाहू  क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या नंदिनी साळोखे हिच्यावर एकेरी पट आणि कस काढून मात केली. तत्पूर्वीच्या लढतीत तिने  6-0 अशी बढतही मिळविली होती. तिला 50 हजार रुपयांसह ‘महापौर केसरी’ कुस्ती स्पर्धेचा मानाचा  किताब देऊन गौरविण्यात आले. नंदिनीला 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.  55 किलो गटात शिंगणापूरच्या दिशा कारंडे हिने मुरगूडच्या अंकिता शिंदे हिला 6-4 अशा गुणफरकाच्या आघाडीसह एकेरी कस काढून चितपट केले. 60 किलोगटात मुरगूडच्या सृष्टी भोसले हिने आमशीच्या विश्रांती पाटील हिला 5-3 अशा गुणफरकाने नमवून बाजी मारली.   

कोल्हापूर मनपाच्या वतीने राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात सुरू असणार्‍या ‘महापौर चषक’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेंतर्गत महिलांच्या सन्मानार्थ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

गौरव महिलांच्याच हस्ते
कुस्ती लढतींचे उद्घाटन आणि बक्षीस समारंभ महिलांच्याच हस्ते झाले. संयोगिताराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, माजी खा. निवेदिता माने यांच्या हस्ते आणि महापौर सौ. हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली महिला कुस्तीगिरांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी माणिक माळी (नगराध्यक्ष, कागल), अलका स्वामी (नगराध्यक्ष, इचलकरंजी), निमा माने (नगराध्यक्ष,जयसिंगपूर), रूपाली धडेल (नगराध्यक्ष, पन्हाळा), स्वाती कोरी (नगराध्यक्ष, गडहिंग्लज), क्रांती शिंदे, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, प्रभाग समिती सभापती प्रतीक्षा पाटील, केडीसी बँकेच्या संचालिका उदयानी साळोखे, पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील व पुष्पलता मंडले,  नगरसेविका दीपा मगदूम, वृषाली कदम, स्वाती येवलूजे, माधुरी लाड, शोभा कवाळे, उमा बनछोडे, सुनंदा मोहिते, शमा मुल्ला,  छाया पोवार, सुरेखा शहा, संगीता खाडे जाहिदा मुजावर  उपस्थित होते. 

आज पुरुष गटातील अंतिम लढत
शुक्रवारी (दि. 8) डिसेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवरचा हिंद केसरी पै. कमलजितसिंह (पंजाब) विरुद्ध  कोल्हापुरातील गंगावेश तालमीचा मुंबई केसरी, पै. माऊली जामदाडे यांच्यात पुरुष गटातील अंतिम लढत होणार आहे. या दोघा मल्लांत 2 लाख 85  हजार इतके मानधन विभागून देण्यात येणार आहे. 

लहान मुलींसह वृद्धांची उपस्थिती 
मैदानात लहान मुली, शाळा-महाविद्यालयातील युवती, गृहिणी आणि ज्येष्ठ महिलांनी उपस्थिती लावून महिला कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिले. मैदानात विविध खाद्य पदार्थांची विक्री करण्यासाठीही महिलाच उपस्थित होत्या. 

दोन गटांत हाणामारीचा प्रकार 
पुरुष गटाची कुस्ती सुरू असताना मैदानात दोन गटांत हाणामारीचा प्रकार झाला. मनपाचे पदाधिकारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत एकमेकांवर धावून जाणार्‍या समर्थकांना रोखत शांत केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे मैदानात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महिला कुस्तीपटूंना दत्तक घ्यावे 
कोल्हापूरचे नाव कुस्ती क्षेत्रात देशपातळीवर आणि जगभर पोहोचवत असणार्‍या महिला कुस्तीगिरांना पाठबळ आणि प्रोत्साहन म्हणून साखर कारखाने, उद्योजक, दूध संघांनी पुरुष पैलवानांप्रमाणे महिला कुस्तीपटूंनाही दत्तक घ्यावे व कोल्हापुरातून साक्षी मलिकसारख्या खेळाडू घडवाव्यात असे आवाहन कुस्तीप्रेमींनी चिठ्ठ्यांद्वारे केले.