Mon, Jul 22, 2019 13:46होमपेज › Kolhapur › 'स्‍वाभिमानी'चे आंदोलन दडपण्याचे प्रयत्‍न

'स्‍वाभिमानी'चे आंदोलन दडपण्याचे प्रयत्‍न

Published On: Jul 15 2018 7:15PM | Last Updated: Jul 15 2018 7:15PMकोल्हापूर :

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्यापासून (१६ जुलै) दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन दडपण्याचा शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी २०१२ च्या करवीर तालुक्याच्या दूध आंदोलनातील संशयित ३८ लोकांना जिल्हा पोलिस मुख्यालयात बोलावून घेतले. त्यांच्याकडून कलम भा.दं.वि. १०७ नुसार उद्याच्या होणाऱ्या आंदोलनात हिंसक कृत्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आंदोलनात अग्रभागी असाल तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे म्हणाले, दुध संकलनच बंद असल्यामुळे आंदोलन हे शांततेत असेल. आंदोलकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. सकाळी ८ वाजल्या पासून दुपारी ३ वाजेपर्यंत लोक उपाशी पोटी पोलिस मुख्यालयात थांबून आहेत. अशाप्रकारे आतापासूनच आंदोलकांना  नाहक त्रास दिला जात आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रु. अनुदान अथवा २७ रुपये दर द्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी केली आहे. गोकुळ दूध संघाने उद्या दूध संकलन बंद ठेवले आहे. त्यामुळे सर्वत्र दुधाचा तुटवडा होणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. पहाटे ग्रामदेवतेला दुधाचा अभिषेक घालून प्रत्येक गावातून आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

उद्याच्या दूध आंदोलनाला हिसंक वळण लागू नये म्हणून पोलिस दलाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी कोडोली, शाहुवाडी येथे १८ पोलिस, गोकुळ शिरगाव येथे १८ पोलिस, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड येथे ११ पोलिस, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड येथे ११ पोलिस तर वडगाव, इचलकरंजी येथे ११ पोलिस असा वाढीव बंदोबस्त दिलेला आहे.