Wed, Jul 17, 2019 20:47होमपेज › Kolhapur › उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घेराव

उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घेराव

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बदलीच्या ठिकाणी अद्याप हजर न झाल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील बंद असलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना सुमारे दोन तास घेरले. अखेर हजर न होेणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्याचे तसेच बंद असलेल्या शाळांना शिक्षक देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शाळा सुरू झाल्या तरी शाहूवाडी तालुक्यातील 39 शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याने शाळांचे कुलूप काढण्यात आले नव्हते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हा परिषदेने साधारणपणे तीस शिक्षकांची या शाळांमध्ये बदली केली. त्यातील अनेकांनी बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात बदलीच्या ठिकाणी काही शिक्षक मुदतीत हजर राहू शकले नाहीत. तर अजूनही पाच शिक्षक बदली झालेल्या ठिकाणाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील 9 शाळांना अजूनही कुलूप आहे. 

या शाळा सुरू कराव्यात व संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना घेराव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दुपारपासून कार्यकर्ते जिल्हा परिषदेसमोर जमत होते. दुपारी पावणेदोन वाजता कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे गेले. मात्र, ते नसल्याने आंदोलकांनी आपला मोर्चा प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या कार्यालयाकडे वळविला. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ते आडसूळ यांच्या कार्यालयात गेले. 

यावेळी कार्यकर्त्यांनी  आडसूळ यांना शाहूवाडीतील बंद शाळा काय उपाययोजना केली याबाबत प्रश्‍नांची सरबत्ती केली. श्री. आडसूळ यांनी शिक्षकांच्या बल्याबाबत जिल्हा परिषद स्तरावर काही अधिकार नाहीत. तरीही  शाहूवाडीतील सर्व शाळांमध्ये शिक्षक देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. राहिलेल्या शाळांमध्ये देखील शिक्षक दिले जातील, असे आश्‍वासन दिले. यावर आंदोलकांनी  शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे आम्हाला कारणे न सांगता जिल्ह्यातील शिक्षकांची पदे त्वरित भरावीत व हजर न झालेल्या तसेच उशिरा हजर झालेल्या शिक्षकांवर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात लेखी पत्र मिळाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी आडसूळ यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर दोन तासाच्या चर्चेनंतर हजर न झालेल्या व मुदतीत हजर न झालेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

आंदोलनात संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सागर शंभूशेटे, रमेश भोजकर, विजय भोसले, वसंत पाटील, सुरेश माहूरकर, अजित साळुखे, गुरुनाथ शिंदे, संतोष लाड, अमर पाटील, पंकज पाटील, रामेश नकाते, अमोल पाटील, भीमगोंडा पाटील, बाळगोंडा पाटील, सुरेश चौगुले आदी सहभागी झाले होते.

आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्याचा इशारा
शाहूवाडीत बदली झालेल्यांपैकी दिलीप कुमार मल्लाप्पा, पूनम परीट, शोभाताई  सुतार, अशा कांबळे, संदीप इंगवले हे पाच शिक्षक अद्याप हजर न झाल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची आंतरजिल्हा बदली रद्द करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

बिन पगारी रजा
बदली झाल्यानंतर आदेश मिळाल्यापासून सात दिवसांची मुदत बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी देण्यात आली होती. त्यापैकी 14 शिक्षक मुदतीत हजर झाले नसल्याचे आढळून आले.  ते मुदतीनंतर जेवढ्या दिवसांनी हजर झाले आहेत तेवढ्या दिवसांची बिनपगारी रजा मांडण्यात येणार आहे.