Fri, Nov 16, 2018 21:36होमपेज › Kolhapur › महामार्गावरील लूटमारप्रकरणी सुरजा-गोंद्या टोळीला ‘मोका’

महामार्गावरील लूटमारप्रकरणी सुरजा-गोंद्या टोळीला ‘मोका’

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह राष्ट्रीय महामार्ग व सीमाभागात आलिशान वाहने रोखून व्यापार्‍यासह पर्यटकांना लूटणार्‍या सुरजा-गोंद्या या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्‍का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी या कारवाईला सोमवारी मंजुरी दिली. शहरासह जिल्ह्यातील आणखी दोन टोळ्या ‘रडार’वर आहेत.असे सांगण्यात आले.

टोळीप्रमुख सूरज ऊर्फ कैलास सर्जेराव दबडे (वय 21, रा. साखरवाडी, वाठार, ता. हातकणंगले), गोविंद वसंत माळी (19, गणपती मंदिराजवळ, पेठवडगाव), ओंकार महेश सूर्यवंशी (19, कासेगाव, ता. वाळवा), विराज गणेश कारंडे (20, अंबप, ता. हातकणंगले) याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांचा मोक्‍काअंतर्गत कारवाईचा समावेश आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विकास जाधव यांनी म्होरक्यासह टोळीतील साथीदारांविरुद्ध मोक्‍काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. टोळीतील सराईतांविरुद्ध खंडणी, वाटमारी, जबरी चोरी, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविल्याप्रकरणी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

कोडोली, पेठवडगाव, शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यांत 34 गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील नऊ टोळ्यांतील 57 गुन्हेगारांवर मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.