Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Kolhapur › पहाटेच्या निरव शांततेत सी.पी.आर. सुन्‍न

पहाटेच्या निरव शांततेत सी.पी.आर. सुन्‍न

Published On: Feb 19 2018 10:04PM | Last Updated: Feb 19 2018 10:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

नागाव येथील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना चार रुग्णवाहिकांतून दाखल केल्यानंतर विव्हळणे, किंचाळणे आणि ओक्साबोक्सी रडण्याने पहाटेच्या निरव शांततेतही सी.पी.आर. इस्पितळाचा परिसर सद‍्गदीत झाला. विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांपैकी विरळे (ता. शाहूवाडी) येथील सुमित कुलकर्णीचे आई-वडील सर्वात प्रथम इस्पितळात पोहोचले. सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचलेल्या या माता-पित्यांना आपलं लेकरू गतप्राण झाल्याचे समजताच त्यांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थित पोलिस, डॉक्टर आणि  तळातील कर्मचारी व इतर रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा अश्रू अनावर झाले.

वाचा : इंजिनियरिंगचे सहा विद्यार्थी अपघातात ठार

सुमितच्या आईने माझा बाळ माझ्या मांडीवर आणून ठेवा म्हणून दिलेल्या हाकेने पोलिस थरथरू लागले. तर त्याच्या मित्रांनी टाहो फोडला. पोलिसांनी अपघाताची माहिती अगोदरच दिल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे पाच वाजताच इस्पितळात पोहोचले. त्यांनी इतर वरिष्ठ आणि निवासी वैद्यकीय  धिकार्‍यांना बोलावून घेऊन उपचारासाठी सज्जता ठेवली. जखमी येतील तसे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले.

त्यामुळे काहीजणांना जीवदान मिळाले. जखमीनंतर दैव बलवत्तर म्हणून अपघातात किरकोळ जखमी झालेले किंवा अजिबातच जखमी न झालेले इतर विद्यार्थी इस्पितळात पोहोचल्यानंतर सहकारी मित्रांची अवस्था पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ओक्साबोक्सी रडत काहीजणांनी तर टाहोच फोडला. 18 ते 22 वयोगटातील या कोवळ्या तरुणांनी आपल्याच वयाच्या मित्रांना गमावल्याने त्यांची भावनिक अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. एकमेकांच्या गळ्यात पडून रडणार्‍या या तरुणांना त्यांच्याचपैकी काहीजण आणि इस्पितळात दाखल असणार्‍या इतर रुग्णांचे नातेवाईक धीर देत होते.

विरळे येथील कुलकर्णी दाम्पत्यांच्या पाठोपाठ अंजनी (ता. तासगाव) येथील सुशांत पाटीलचे पालकही सी.पी.आर. रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर तर रुग्णालयाच्या आवारात केवळ दुःखाचा डोंगर उरावर घेऊन आपल्या पाल्यासाठी हंबरडा फोटणार्‍या पालकांचा आक्रोशच सुरू झाला. त्यानंतर जसजसे नातेवाईक येऊ लागले तसतसे इस्पितळाच्या आवारातील वातावरण अधिकच धीरगंभीर बनले. पहावे तिकडे दुःखी आणि रडारड करणार्‍यांचाच वावर असे चित्र सकाळी दहावाजेपर्यंत निर्माण झाले.
सकाळी दहा वाजता पोलिसांचे पंचनाम्याचे काम संपल्यानंतर शवविच्छेदनाला सुरुवात झाली. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.

वाचा : दुचाकीची दगडाला धडक शिवप्रेमी ठार एक जखमी

आपल्या लाडक्यांना शववाहिकेतून नेण्याची वेळ आलेल्या पालकांची स्थिती पाहून तेथील उपस्थितांची मनेही हेलावली आणि प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओल्यावल्या.
अपघातातील मृत व जखमींना सी.पी.आर. इस्पितळात दाखल केले असल्याचे समजताच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिसप्रमुख संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, आर. आर. पाटील आणि त्यांचे सहकारी पोहोचले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्याशी चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

त्यानंतर महसूल व पोलिस अधिकार्‍यांनी मृत व जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. काही जखमी परप्रांतीय असल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून त्यांचे पत्ते व फोन नंबर मिळविण्यात आले. त्या माध्यमातून नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. ज्या जखमी विद्यार्थ्यांचे नातेवाईक नव्हते त्यांना सहकारी विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक तसेच या अधिकार्‍यांनी धीर दिला. तुमचे नातेवाईक येत आहेत, काळजी करू नका, असे सांगत त्यांना आधार देत त्यांना मानसिक धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला.
 

सुमितच्या मृत्यूने विरळेत हळहळ

विरळे (ता.प शाहूवाडी) येथील कु. सुमित संजय  कुलकर्णी (वय 23) याचे नागाव फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्याच्या निधनामुळे विरळे गावासह संपूर्ण कानसा खोर्‍यात हळहळ व्यक्‍त होत आहे. त्याचा मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला आहे. सुमित सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग विभाग तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. सुमित हा शेतकरी व सुशिक्षित कुटुंबातील असून त्याची गावात हुशार विद्यार्थी म्हणून ओळख होती. प्राथमिक शाळा विरळे येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना इयत्ता 7 वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

माध्यमिक विद्यालय उदयगिरी विद्यानिकेतन इयत्ता 10 वी मध्ये उल्‍लेखनीय गुण प्राप्त केले होते. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच संपूर्ण कानसा खोर्‍यावर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रम रद्द केले. शाहूवाडीच्या सभापती  स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, पं. स. सदस्य, जालिंदर पाटील यांनी भेट देऊन कुलकर्णी कुटुंबाचे सांत्वन  केले.