कोल्हापूर : प्रतिनिधी
वेळ दुपारी दोनची... दसरा चौकातील आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे,’ या घोषणांचा अखंड गजर सुरू होता. इतक्यात कणेरीवाडीतील युवकाने मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचे वृत्त आंदोलनस्थळी धडकले आणि क्षणात व्यासपीठावर स्तब्धता पसरली... आंदोलक नि:शब्द झाले... माईकवर बोलणारा कार्यकर्ता थांबला... क्षणाचाही विलंब न करता कार्यकर्त्यांनी दसरा चौकात मानवी साखळी केली... रस्ता अडवला... चौकातील फेरीवाल्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. आरक्षणाच्या घोषणांनी दणाणणारा ऐतिहासिक दसरा चौकही गहिवरला अन् नीरव शांतता पसरली. रात्री उशिरापर्यंत हळहळ व्यक्त केली जात होती.
मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा रविवारचा बारावा दिवस होता. सकाळपासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक गावांतील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करीत होते.
दुपारी दोनच्या सुमारास कणेरीवाडी येथील सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता विनायक गुदगी याने आरक्षण मिळत नसल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचे वृत्त दसरा चौकात समजले अन् दसरा चौक नि:शब्द झाला. व्यासपीठावरील कार्यकर्ते क्षणात रस्त्यावर उतरले आणि चौकात ठाण मांडत रास्ता रोको केला. प्रत्येकाच्या चेहर्यावर दु:खाची छाया पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलकांसमवेत रस्त्यावरच बैठक मारून संवाद साधत शांततेचे आवाहन केले. यानंतर दसरा चौकातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. आतापर्यंत शांततेत आंदोलन सुरू आहे. यापुढेही कार्यकर्त्यांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, असे आवाहन व्यासपीठावरून करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्ते मनात दु:ख घेऊन शांत होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही आंदोलकांसमवेत रस्त्यावर बसले.
यावेळी आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना बोलण्याची विनंती केली. प्रारंभी सर्वांनी दोन मिनिटे शांतता पाळून विनायक गुदगी याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी चव्हाण यांनी सरकारने आता तुणतुणे वाजवण्याचे बंद करावे, असा इशारा दिला.