Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Kolhapur › रेडीमेड ऊस रोपाचा ट्रेंड!

रेडीमेड ऊस रोपाचा ट्रेंड!

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:50PM

बुकमार्क करा
कौलव : राजेंद्र दा. पाटील

यावर्षीच्या ऊस लावणचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मजुरांची टंचाई, ऊस बियाण्याचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकरीवर्ग उसाच्या रेडीमेड रोपांना पसंती देत आहे. त्यामुळे ऊस रोपवाटिकांची संकल्पना शेतकरीवर्गात रूजू लागली आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांत उसाच्या रोपवाटिकेची संकल्पना शेतकरीवर्गात मूळ धरू लागली आहे. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ऊस लावण स्वर्खिक व वेळखाऊ पद्धतीची आहे. सध्या मजूर टंचाईचा प्रश्‍न उग्र बनला आहे. त्यामुळे कमी श्रमात व खर्चात ऊस लावणचा पर्याय म्हणून रोपांचा पर्याय पुढे आला आहे. एक एकर ऊस लावणला किमान बाराशे नग ऊस लागतो. म्हणजेच दीड टन ऊस लागतो. बियाणे म्हणून विकत घेतल्यामुळे एका उसाची किंमत दहा ते बारा रुपये असते. एका उसात किमान बावीस ते सव्वीस ऊस रोपे होतात. 

उसाची थेट रोपेच लावल्यामुळे लावण बुडण्याचा प्रश्‍न येत नाही व दोन रोपांतील अंतरामुळे बचतही होते. कांडी पद्धतीने लावण केल्यास बुडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोप लावण जगण्याचे प्रमाण 98 ते 100 टक्के असते. मजुरांची बचत होते. तसेच खते थेट रोपांनाच दिल्यामुळे उसाची वाढ समप्रमाणात होते. बहुतांश कारखाने रोप लावणच्या उसाची तारीख एक महिना अगोदर करतात. त्यामुळे तोडणीही लवकर होते. या पद्धतीने ऊस लावण केल्यास सरासरी ऊस उत्पादनात दहा ते वीस टक्के वाढ होते. या पद्धतीत को. 92005, को. 86032 यासह जास्त उतारा व वजन देणार्‍या रोपांना शेतकरी मोठ्या प्रमाणात पसंती देत असून, कारखान्यांनाही ही सरासरी उतारा गाळप वाढवण्यास मदत होत आहे.

फसवणुकीचाही धोका
उसाच्या रोप लावणकडे वाढणारा शेतकर्‍यांचा कल पाहून आता गावोगावी छोट्या-मोठ्या रोपवाटिकांचे पेव फुटले आहे. अनेक ठिकाणी खोडवे-निडव्यापासून तयार केलेली रोपे विक्री केली जातात. त्यामुळे या रोपांना मर लागते. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूकही होत आहे.