Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Kolhapur › ऊस दरासाठी केव्हाही आंदोलन करू

ऊस दरासाठी केव्हाही आंदोलन करू

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखर कारखानदारांनी पहिली उचल 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली असताना तो दिलेला नाही.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या विषयावर बोलत नाहीत. साखर कारखाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील युद्ध पाहण्यातच त्यांना स्वारस्य दिसत आहे; पण यामध्ये काही तोडगा निघाला नाहीतर कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनाचे रणशिंग फुंकू. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला. 

सन 2017-18 च्या हंगामात उसाची पहिली उचल एफआरपी अधिक 200 रुपये अशी ठरली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. राजू शेट्टी व साखर कारखाना प्रतिनिधी यांच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने डिसेंबर 2017 अखेरची बिले अदा करण्याची नैतिकता साखर कारखान्यांनी दाखवली. मात्र, आता सर्व साखर कारखान्यांनी दराच्या घसरणीची बाब पुढे आणून 2500 रुपयेची पहिली उचल देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचा निषेध आहे. मात्र, मुख्यमंत्री व पालकमंत्रीही या विषयाकडे गंभीरपणे पाहताना दिसत नाहीत.त्यामुळेच आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशाच प्रकारचे निवेदन स्वाभिमानीने साखर सहसंचालकांना दिले आहे. यावेळी भगवान काटे, जालंदर पाटील, सावकार मादनाईक, रमेश भोजकर, राजेंद्र गड्ड्याणवार, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.