Sat, Apr 20, 2019 16:37होमपेज › Kolhapur › ऊसतोडणी यांत्रिकीकरण उंबरठ्यावर

ऊसतोडणी यांत्रिकीकरण उंबरठ्यावर

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:35PMकौलव : राजेंद्र दा. पाटील

यंदाच्या गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांअभावी तोडणी-ओढणी यंत्रणेचा झालेला बट्ट्याबोळ, त्या अनुषंगाने वाढणारा उत्पादन खर्च व आगामी हंगामातील उसाचे संभाव्य बंपर क्रॉप, यामुळे कारखानदार व ऊस उत्पादकही हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कारखाने व शेतकरीही केन हार्वेस्टरकडे वळू लागले आहेत. ऊसतोडणीचे यांत्रिकीकरण साखर  कारखानदारीच्या उंबरठ्यावर आले आहे.

गतवर्षी राज्यात 6 लाख 30 हजार हेक्टरवरील 373 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यंदा 9 लाख 2 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस लागण असून, 722 लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज आहे. सलग दोन वर्षे मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे मजूरटंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गुजरात व मध्य प्रदेशातील कारखान्यांनी ऊसतोडणी- ओढणी मजुरीचे दर वाढवले आहेत. परिणामी, परभणी, नांदेड, नाशिक, हिंगोली या परिसरातील मजुरांनी तिकडे धाव घेतली आहे. त्याचा पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.  

आगामी हंगामातही राज्यात सात कोटी टनांपर्यंत ऊस गाळप होणार आहे. त्यामुळे यंदाच्या संकटातून धडा घेत कारखानदारांनी मध्यम व लहान क्षमतेचे केन हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी मोर्चेबांधणी चालवली आहे. राज्य शासनानेही हार्वेस्टर खरेदीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. ग्रामीण भागातून अनेक शेतकरीही हार्वेस्टर खरेदीसाठी पुढे येत आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीला हार्वेस्टर खरेदीबाबतचे अधिकार दिले आहेत. साखर कारखान्यांनी हार्वेस्टरला कामाची हमी देऊन संबंधित बँकांना बिल वसूल करून देण्याचे हमीपत्र दिल्यानंतरच कर्ज प्रकरण मंजूर केले जाणार आहे. 

राज्यात आतापर्यंत तीनशे हार्वेस्टरचा वापर सुरू आहे. आगामी वर्षात आणखी तितकेच हार्वेस्टर दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. न्यू हॉलंड आणि शक्तिमान कंपन्यांनी विकसित केलेल्या हार्वेस्टरची संख्या जास्त आहे. एका हार्वेस्टरची किंमत 95 लाखांपर्यंत आहे. ऊस भरण्यासाठी लागणार्‍या ट्रॉली-ट्रॅक्टरसह ही किंमत सव्वा ते दीड कोटी रुपयांपर्यंत जाते. सध्या बहुतांशी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कंपन्या हार्वेस्टरचे प्रात्यक्षिक दाखवत असून, शेतकरी व कारखानेही त्यात रस दाखवत आहेत. त्यामुळे ऊसतोडणीचे यांत्रिकीकरण अटळ बनले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात अडथळे

पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे डोंगररांगातून वसले आहेत. अपवाद वगळता मध्यम-छोटे शेतकरी जास्त आहेत. डोंगराळ पार्श्‍वभूमी, रस्त्यांची अडचण व लहान-लहान वाफे (पट्ट्या) यामुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरने ऊसतोडणी अडचणीची ठरणार आहे. प्रचलित हार्वेस्टर ताशी वीस टन ऊसतोडणी-भरणी करतात. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी लहान व ने-आण करण्यास सुलभ ठरणारे हार्वेस्टर विकसित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.