Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Kolhapur › काय बी करा; पण ऊस तेवढा न्या!

काय बी करा; पण ऊस तेवढा न्या!

Published On: Mar 07 2018 8:37AM | Last Updated: Mar 07 2018 8:37AMसरवडे :  वार्ताहर

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही ऊस तोडणी टोळ्यांकडून शेतकर्‍यांची जादा खुशालीसाठी अडवणूक सुरूच आहे. त्यामुळे नडलेला ऊस उत्पादक शेतकरी मागेल ती खुशाली देतो. अन् ऊस पेटवा, काय बी करा; पण तेवढा न्या! अशा कळकळीची विनंती ऊस उत्पादक शेतकर्‍यांना करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली. सुरुवातीपासून उसाची पळवापळवी सुरूच होती. त्यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकरी पाहिजे त्या कारखान्याला ऊस पाठवून रानं मोकळी करत होते. याचा फायदा अनेकांनी आंतर पिके तर काहींनी नवीन पिके घेण्यावर भर दिला; पण तरीही ऊस तोडीसाठी टोळ्यांना खुशाली द्यावी लागली होती. पण अनेक शेतकरी करार व सभासदत्वाशी बांधिल राहत मातृसंस्था कारखान्यात ऊस पाठवायचा या उद्देशाने ऊस ठेवला होता; पण त्यासाठी शेतीसेंटर कार्यालय, ऊसतोड टोळ्यांकडे हेलपाटे मारताना ऊस उत्पादक शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. गतसाली उशिरा ऊस गेल्याने यावर्षी तोडणीची वाट पाहून हतबल झाला आहे. उरल्यासुरल्या उसांचीही ऊसतोडणी टोळ्यांकडून जादा खुशालीसाठी अडवणूक केली जात आहे.

काही शेतकर्‍यांनी मातृसंस्था कारखान्यास ऊस ठेवला आहे. मात्र, तो पाठवण्यासाठी मोठे दिव्य करावे लागत आहे. खुद्द ऊस तोडणी करताना माणसा अभावी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ऊस पेटविला तर कारखान्याकडून प्रतिटनास 200 रुपयांची कपात होणार हे माहीत असूनही ऊस उत्पादक शेतकरी ऊस पेटवा... काय बी करा...पण तेवढा न्या! अशा विनवण्या करत आहे.