होमपेज › Kolhapur › उतार्‍यात वाढ; पण वजनात घट

उतार्‍यात वाढ; पण वजनात घट

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:59AMकुडित्रे : प्रा.एम. टी.शेलार

 संपत आलेल्या गळीत हंगामात  थकीत ऊस बिले, अपुरी उचल आणि तोडणी वाहतूकदारांची मनमानी या संकटांनी ऊस उत्पादक घेरला असला तरी साखर कारखान्यांना मात्र 14 ते 15 टक्क्यांच्या पुढे दैनंदिन साखर उतारा मिळत आहे. त्यामुळे साखरेचे दर घसरले असले तरी साखर उतारे वाढल्यामुळे प्रतिटन ऊस गाळपापासून 140 ते 150 किलो इतके विक्रमी साखर उत्पादन मिळत आहे.

शेतकर्‍याच्या उसाच्या वजनात घट, मात्र कारखान्याच्या साखर उत्पादनात वाढ अशा विचित्र स्थितीमुळे कारखाने फायद्यात तर ऊस उत्पादक तोट्यात अशी स्थिती आहे. काही साखर कारखान्यांनी सहा-सात महिन्यांचा कोवळा ऊस गाळपास सुरुवात केल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

पुढील हंगामातील एफ.आर.पी. वर परिणाम
पुढील (2018-19) च्या हंगामात पहिल्या 9.5 टक्के उतार्‍याला प्रतिटन 2750 रुपये व पुढील 1 टक्का उतार्‍याला 289 प्रतिटन रुपये वाढ (निव्वळ प्रतिटन 200 रुपये वाढ)अशी एफ.आर.पी.ची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. या एफ.आर.पी. साठी चालू हंगामातील सरासरी साखर उतारा पायाभूत मानला जाणार आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा आतापर्यंतचा सरासरी उतारा 12.34  ते 13.33 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या सरासरी उतार्‍याला प्रतिटन 3856 रुपये एवढी एफ.आर.पी.येते. यातून प्रतिटन  500 रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 3356 ते 3400 रुपये पहिली उचल कायदेशीररीत्या द्यावीच लागेल. त्यावेळी साखरेच्या पडलेल्या दराचे कारण सांगून चालणार नाही. त्याचे आतापासूनच नियोजन करावे लागेल.

कोवळा ऊस गाळून उतारा मारल्याची तक्रार 
एफ.आर.पी. ही सरासरी साखर उतार्‍यावर अवलंबून असते. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन  118 ते 127 दिवसांचा कालावधी उलटला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. या हंगामात ऐन उन्हाळ्यातही कारखान्यांना दैनंदिन 14 ते 15  टक्क्यांदरम्यान साखर उतारे मिळत आहेत. सरासरी साखर उतारे 12.87 ते 13.33 टक्क्यांच्या दरम्यान आहेत म्हणजे एक टन उसापासून कारखाने  145 ते 150 किलो साखर तयार करीत आहेत. उत्तर प्रदेशात सरासरी साखर उतारा 9.50 टक्क्यांदरम्यान असतो. प्रतिटन 50 किलो एवढी जादा साखर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने मिळवतात. प्रतिकिलो 30 रुपये दर गृहीत धरला तरी प्रतिटन सुमारे 1500 रुपये अतिरिक्त उत्पन्न कारखाने मिळवित आहेत. तरी एफ.आर.पी. देताना रडतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी एका खासगी कारखान्यावर सहा-सात महिन्यांचा अगदी कोवळा ऊस गाळ्पासाठी आणल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून तो ऊस गाळपासाठी घेण्यास विरोध केला. त्यांच्या मते, अशा उसामुळे साखर उतारा घटून आमच्या एफ.आर.पी.वर परिणाम होतो. आमचा उतारा घटवता, असा आरोप केला. ऊस उत्पादक मात्र दर किती? उचल किती, याचा विचार न करता ऊस घालवून रान रिकामे करण्याच्या नादात आहेत.