Sun, Aug 25, 2019 00:02होमपेज › Kolhapur › हक्काचा ऊस गमावण्याची वेळ

हक्काचा ऊस गमावण्याची वेळ

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:20PM

बुकमार्क करा
हमीदवाडा : मधुकर भोसले

गाळप उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी बहुतांशी साखर कारखाने हे अद्यापही कार्यक्षेत्राबाहेरील उसाला प्राधान्य देत आहेत. परिणामी, कार्यक्षेत्रातील व जवळच्या अंतरावरील हक्काचा ऊस गमावण्याची वेळ कारखान्यांवर येत आहे. कारण वाट पाहण्याच्या मानसिकतेत शेतकरी नसल्याने अन्य कार्यक्षेत्रांतील कारखाने तोडीसाठी पायघड्या घालत असल्याने शेतकरीही ऊस पाठवत आहेत. 

ऊसतोडीबाबत सध्या विचित्र परिस्थिती गावागावांत पाहायला मिळते आहे. कारखाने आपल्या कार्यक्षेत्रात क्रमपाळीनुसार ऊसतोडणी कार्यक्रम राबवतात व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मात्र लावण, खोडवा असे काही न पाहता व तारीख न पाहता उचल करतात. यामागे धोरण असे असते की, आपला करारबद्ध हक्काचा ऊस राखीव ठेवायचा व कार्यक्षेत्राबाहेरील उसाची सांगड घालून गाळपाचे उद्दिष्ट साध्य करायचे. कारखान्याच्या एकूणच व्यवस्थापन खर्चाच्या व ऊस दराच्या दृष्टीने अधिकाधिक ऊस गाळप गरजेचे असतेच. मात्र, आता प्रकार असा घडतो आहे की, शेतकरी वाट न पाहता येईल त्या कारखान्यास ऊस पाठवत आहेत. विशेषतः मकर संक्रातीनंतर वाढती उष्णता, पुढे खोडवा पिकाचे व्यवस्थापन, वाढत जाणारा तोडणी वरखर्च यामुळे लवकर रान रिकामे करण्यात शेतकरी मग्न असतात. त्यातच करारबद्ध कारखाना वगळता अन्य एक - दोन कारखाने या शेतकर्‍यांपर्यंत ऊस मागणीसाठी पोहोचत आहेत. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे आपण सभासद आहोत व जिकडे करार केला आहे. तिकडे पाठ फिरवून शेतकरी अन्य कारखान्यांना ऊस पाठवत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे असे करार आहेत त्या कारखान्यांच्या फक्त रेकॉर्डलाच ऊस दिसतो. प्रत्यक्षात मात्र रान रिकामेच असते. परिणामी, वाहतूक खर्च जिथे कमी बसणार आहे.

विनाकराराचा नवा फंडा
साखर कारखान्यांची वाढती संख्या, उसाचे शॉर्टेज या गोष्टी गृहीत धरून ऊस लागण किंवा खोडव्याचा करार कोणत्याच कारखान्याला करायचा नाही. असा नवा फंडा देखील आता प्रचलित होत आहे. जे शेतकरी कारखान्याकडील कोणत्याही अनुदानामध्ये तसेच सेवा संस्थांच्या कर्जामध्ये गुंतलेले नाहीत. असे शेतकरी हा प्रयोग करतातच; पण अन्य शेतकरी देखील लवकर ऊस घालवण्यासाठी ही पद्धती वापरून रोखीने बिल घेऊन पीक कर्ज भरत आहेत. करारापेक्षा या मार्गाने ऊस लवकर जातो. अशी या शेतकर्‍यांची मानसिकता आहे. त्यामुळे करार न करता तोडणी पुढील अगदी काही दिवस पुरवणी करार करणे, तात्पुरता कोड काढणे किंवा ऊस वाहन मालक, ऊस तोडणी मजूर किंवा अन्य संबंधितांच्या नावावर हे शेतकरी ऊस पाठवतात.